Cyberspace 2017 डिजिटल विश्व दहशतवादी व कट्टरतावाद्यांसाठी मोकळे मैदान ठरु नये, याची जबाबदारी प्रत्येक देशाने घेतली पाहिजे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. सायबर सुरक्षा हा आगामी काळातील सर्वात मोठा विषय असून सुरक्षा यंत्रणांनी माहितीची देवाण- घेवाण करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

दिल्लीत ‘ग्लोबल कॉन्फरन्स ऑन सायबर स्पेस’ या परिषदेचे गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. १२० देशांमधील सायबर तज्ज्ञ या परिषदेत सहभागी झाले आहेत. या परिषदेत मोदी म्हणाले, गेल्या दोन दशकांत डिजिटल विश्वातील बदल आपण सर्वांनीच बघितले. १९७० च्या दशकातील मोठमोठे संगणक आजही आठवतात. डिजिटल क्षेत्रात भारताची स्पर्धा ही विकसित देशांशी आहे. मोबाईल फोन आता डेटा स्टोरेज आणि संवादाचे नवे साधन ठरु लागले आहे, असे त्यांनी सांगितले.

आयटी क्षेत्रात भारतातील तरुणांनी जगावर छाप पाडली असून, त्यामुळे भारतीय प्रतिभेची सर्वांना ओळख झाली. भारतीय कंपन्यांनी आयटी क्षेत्रात नाव कमावले, असे त्यांनी आवर्जून सांगितले. तंत्रज्ञानाने सर्व बंधने तोडले असून, भारतीय विचारधाराही अशीच आहे. ‘वसुधैव कुटुंबकम’ हीच आमची विचारधारा असल्याचे ते म्हणाले. भारतात सर्वसामान्यांना डिजिटल सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करत आहोत. मोबाईलचा वापर आम्ही नागरिकांना सशक्त करण्यासाठी करत आहोत. यात ‘आधार’चीही मदत घेतली जात आहे. ‘आधार’चा वापर केल्याने लोकांना दरवेळी रांगेत उभे राहण्याची गरज नाही, असा दावा त्यांनी केला.

जनधन खाते, आधार आणि मोबाईल फोन हे तीन घटक भ्रष्टाचार संपवण्यात आणि पारदर्शक कारभारात महत्त्वाची भूमिका निभावू शकतात, असे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांनाही डिजिटल सुविधा उपलब्ध करुन देत असून, कृषी क्षेत्रातही तंत्रज्ञानाचा वापर वाढवत आहोत, असा दावा त्यांनी केला. भारतातील जनता आता कॅशलेस व्यवहारांवर भर देत आहे. भारतीय नागरिक ‘भीम’ अॅपचा वापर करत असून यामुळे भारत विकासाची नवी उंची गाठेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. केंद्र सरकारने सुरु केलेल्या विविध अॅप्सचीही त्यांनी या कार्यक्रमात माहिती.
सोशल मीडियाने डिजिटल क्षेत्रात सर्वांना समान संधी उपलब्ध करुन दिल्या. तरुणांना त्यांची कल्पकता दाखवण्यासाठी इंटरनेट हे उत्तम माध्यम आहे, असे त्यांनी सांगितले.