सिंगापूर येथील अनिवासी भारतीयांच्या ग्लोबल स्कूल्स फाउंडेशन या संस्थेने भारतात येत्या दोन वर्षांत पाच शाळा सुरू करण्याचे जाहीर केले आहे. २००२ मध्ये या संस्थेची स्थापन झाली असून येत्या दोन वर्षांत पुणे, मुंबई, नागपूर व बंगळुरू येथे पाच शाळा सुरू केल्या जाणार आहेत, असे फाउंडेशनचे प्रमुख कमल गुप्ता यांनी सांगितले.
या संस्थेच्या आंतरराष्ट्रीय शाळा या सिंगापूरमध्ये असून त्यात अनिवासी भारतीयांची मुले शिकतात पण तेथे सीबीएसईचा अभ्यासक्रम शिकवला जातो. सिंगापूरमधील त्यांच्या शाळांमध्ये ५२ टक्के आंतरराष्ट्रीय विद्यार्थी आहेत. टोकियो व कोफू येथील शाळांमध्ये ४० टक्के जपानी विद्यार्थी आहेत. संस्थेने गणित व इंग्रजी सीबीएसई पद्धतीने शिकवण्याचा निर्णय घेतला कारण त्यांचा अभ्यासक्रम चांगल्या दर्जाचा आहे. भारतातील नवीन व्यावसायिक गृहनिर्माण संस्था व मालमत्ता विकसकांशी याबाबत संपर्क साधण्यात आला आहे. या शाळा त्यांच्या सहकार्याने सुरू करण्याचा विचार आहे. गोदरेज समूहाने जीएसएफच्या सहकार्याने अहमदाबाद येथे अशी एक शाळा सुरू केली आहे. २०१७ पर्यंत सिंगापूर येथे १० कोटी डॉलर्स खर्चून शिक्षण केंद्र सुरू केले जाणार आहे. भारत, आग्नेय आशिया व जपान येथे संस्थेच्या २० शाळा असून सप्टेंबरमध्ये दुबईतही शाळा सुरू केली.