जागतिक गुंतवणूकदार आता उत्तर प्रदेशच्या प्रेमात आहेत असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. उत्तर प्रदेशात शांतता नांदू लागल्याने हा बदल घडल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. युरोपातील इंग्लंड, फ्रान्स, इटली आणि स्पेन या चार देशांची लोकसंख्या एकत्र केली तर ती २४ कोटींच्या घरात जाते. आपल्या देशात एकट्या उत्तर प्रदेशची लोकसंख्या २४ कोटी आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशचा दबदबा मोठा आहे असंही उदाहरण त्यांनी दिलं. इतकंच नाही तर करोना काळातील लॉकडाउनमध्ये जे मजूर उत्तर प्रदेशात परतले आहेत, त्यांना आता इथलंच सरकार रोजगार उपलब्ध करुन देतं आहे. सुमारे सव्वा कोटी मजुरांना रोजगार उपलब्ध करुन दिले जातील असंही आश्वासन त्यांनी दिलं. उत्तर प्रदेशातून आजपासून आत्मनिर्भर अभियानाला सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे अभियान लॉन्च केलं. त्यावेळी ते बोलत होते.

जगभरात करोनाचं संकट आहे. मात्र उत्तर प्रदेशने जे साहस दाखवलं त्याचं कौतुक होतं आहे. योगी सरकारचं काम येणाऱ्या पिढ्याही लक्षात ठेवतील असं आहे असंही मोदींनी म्हटलंय. उत्तर प्रदेशात ६० हजार निरीक्षण समिती तयार करण्यात आल्या. त्यामुळे लोक आपसात जोडले गेले..उत्तर प्रदेश सरकारने लाखो मजुरांच्या खात्यात पैसे जमा केले, तसंच महिलांच्या खात्यातही पैसे जमा केले. या सरकारच्या चांगल्या कामांमुळेच आज जागतिक गुंतवणूकदार उत्तर प्रदेशात गुंतवणूक करण्यात उत्सुक आहेत असंही मोदींनी म्हटलं आहे.

उत्तर प्रदेश सरकारने करोनाच्या रुपाने आलेल्या संकटात संधी शोधली आहे. या संकटाशी लढा देण्यात उत्तर प्रदेश सरकार ज्या प्रकारे जोडलं गेलं आहे तो आदर्श इतर राज्यांनीही घेण्यासारखा आहे. आत्तापर्यंत उत्तर प्रदेशात ८५ हजार लोकांचं आयुष्य वाचवण्यात या सरकारला यश आलं आहे. एवढंच नाही तर साधारणतः ४० लाख छोट्या उद्योगांना MSMEs च्या अंतर्गत रोजगार दिला जातो आहे. त्यामुळेच आता विदेशी गुंतवणूकदारही उत्तर प्रदेशात गुंतवणूक करण्यात उत्सुक आहेत असंही मोदींनी म्हटलं आहे.