भारतातील अनेक हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरवण्याच्या दिशेनं भारताच्या कुटनितीला यश आले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहे. फ्रान्स, अमेरिका, रशिया आणि ब्रिटनसह एकूण ४० देशांनी यासाठी समर्थन दिले आहे. फ्रान्स आज गुरूवारी यूएनमध्ये मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्ताव ठेवणार आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, चीन आणि साऊदी अरू या प्रस्तावाला विरोध करणार आहेत.

पुलवामा हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला एकटं पाडण्यासाठी भारताने कंबर कसली आहे. त्याचाच भाग म्हणून मित्र देशांच्या मदतीने कोंडी करण्याचा भारताचा प्रयत्न आहे. डोवल यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर फ्रान्सने हा प्रस्ताव मांडण्याचा निर्णय घेतला आहे.

मसूद अजहरवर पूर्णपणे बंदी घालण्याचा प्रस्ताव ठेवण्याची संयुक्त राष्ट्र संघात ही दुसरी वेळ आहे. याआधी अमेरिकेने २०१७ मध्ये पाकिस्तानी दहशतवादी संघटनेवर बंदी घालण्याचा प्रस्ताव ठेवला होता. अमेरिकेच्या या प्रस्तावाला ब्रिटनने पाठिंबा दिला होता. मात्र, चीनच्या खोड्यामुळे संयुक्त राष्ट्र संघामध्ये तो प्रस्ताव पारित होऊ शकला नाही. आता पुन्हा एकदा तसाच प्रस्ताव ठेवला जाणार आहे.

१४ फेब्रुवारी रोजी पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला होता. या हल्लात ४० जवान शहीद झाले. त्यानंतर भारतीयामध्ये संतापाची लाट पसरली आहे. मोदी यांनी जवानांच्या बलिदानाचा बदला घेतला जाईल असे स्पष्ट केले आहे.