गोल्डन ग्लोब रेसदरम्यान हिंदी महासागरातील वादळात जखमी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गोल्डन ग्लोब रेस-२०१८ या आंतरराष्ट्रीय नौकानयन स्पर्धेदरम्यान जखमी झालेले भारतीय नौदलाचे कमांडर अभिलाष टॉमी यांच्या बचावासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे नौदलाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. दक्षिण हिंदी महासागरात वादळ आणि खवळलेल्या समुद्रामुळे त्यांच्या थुरिया या स्वदेशी बनावटीच्या नौकेचे नुकसान झाले असून टॉमी जखमी झाले आहेत.

त्यांच्या सुटकेसाठी हिंदी महासागरात तैनात असलेली भारतीय नौदलाची आयएनएस सातपुडा ही स्टेल्थ युद्धनौका घटनास्थळाकडे वळवण्यात आली आहे. कमांडर टॉमी यांच्या बचावासाठी भारतीय नौदल, ऑस्ट्रेलियाची संरक्षण दले, तसेच अन्य संस्था प्रयत्न करत आहेत. बचावकार्याचे नियोजन ऑस्ट्रेलियातील कॅनबेरा येथील केंद्रातून केले जात आहे.

गोल्डन ग्लोब रेस ही आंतरराष्ट्रीय ख्यातीची आणि अत्यंत कठीण नौकानयन स्पर्धा आहे. यंदाच्या स्पर्धेला १ जुलै रोजी फ्रान्समधील ला सेब्ला दोलॉन येथून सुरुवात झाली. जगातील १८ खलाशी त्यात भाग घेत असून ते साधारण ३०,००० सागरी मैलांचा प्रवास करून फ्रान्समधील मूळ ठिकाणी परततील. स्पर्धकांनी कोणत्याही बाह्य़मदतीविना एकटय़ाने पृथ्वीप्रदक्षिणा करायची असते. कमांडर टॉमी यांनी यापूर्वी २०१३ साली समुद्रमार्गे पृथ्वीप्रदक्षिणा केली आहे.

या स्पर्धेत आतापर्यंत ८४ दिवसांत १०,५०० सागरी मैलांचा खडतर प्रवास करून कमांडर टॉमी हे तिसऱ्या स्थानावर होते. हिंदी महासागराच्या दक्षिणेकडील प्रदेशात ऑस्ट्रेलियातील पर्थ येथून साधारण १९०० सागरी मैल अंतरावर असताना त्यांना वादळाने गाठले. ताशी १३० किमी वेगाने वाहणारे वारे आणि १० मीटर उंचीच्या लाटांच्या तडाख्याने टॉमी यांच्या थुरिया या नौकेची (यॉट) डोलकाठी (मास्ट) तुटली आणि टॉमी यांच्या पाठीला इजा झाली.

स्पर्धेच्या संयोजकांनी फ्रान्समधून दिलेल्या माहितीनुसार आर्यलडचे ग्रेगर मॅकगुकिन आणि हॉलंडचे मार्क स्लॅट्स यांच्याही नौकांना वादळाचा तडाखा बसला. ताशी ७० नॉट्सच्या वेगाने वाहणारे वारे आणि १४ मीटर उंचीच्या लाटांनी ग्रेगर यांच्या नौकेचीही डोलकाठी तुटली आणि स्लॅट्स यांच्या नौकेला दोनदा मार बसला. मात्र ग्रेगर आणि स्लॅट्स या दोघांकडूनही ते सुरक्षित असल्याचा संदेश मिळाला आहे.  स्लॅट्स हे स्पर्धेत दुसऱ्या स्थानावर होते. टॉमी यांच्या थुरिया नौकेपासून ग्रेगर यांची नौका सर्वात जवळ म्हणजे ९० सागरी मैलांवर आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Global race commander abhilash tomy likely safe indian navy and australia coordinating rescue
First published on: 23-09-2018 at 00:55 IST