21 October 2020

News Flash

जागतिक मंदीचे भारतात पडसाद

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी प्रमुखांचा आर्थिक विकासदराबाबत धोक्याचा इशारा

| October 10, 2019 12:35 am

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी प्रमुखांचा आर्थिक विकासदराबाबत धोक्याचा इशारा

वॉशिंग्टन : जगातील सर्वात मोठय़ा उदयोन्मुख अर्थव्यवस्था असलेल्या देशांपैकी महत्त्वपूर्ण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतात जागतिक पातळीवरील आर्थिक मंदीसदृश स्थितीचे परिणाम दिसू लागल्याचे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख क्रिस्टॅलिना जॉर्जिएव्हा यांनी स्पष्ट केले. तसेच येत्या वर्षांत मंदीची झळ भारताला अधिक सोसावी लागण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली.

जागतिक अर्थव्यवस्था सध्या मंदीसदृश स्थितीतून वाटचाल करीत असून त्यामुळे जगातील नव्वद टक्के देशांचा आर्थिक विकास दर कमी होणार असल्याचा धोक्याचा इशाराही त्यांनी दिला. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक असलेल्या जॉर्जिएव्हा यांनी सांगितले की, जगात सध्या मंदीसदृश स्थिती असून या वर्षी आर्थिक विकास दर हा दशकाच्या आरंभापासून प्रथमच सर्वात कमी असेल. जागतिक आर्थिक स्थितीचा अहवाल पुढील आठवडय़ात जारी केला जाणार असून त्यात २०१९ व २०२० या वर्षांचा सुधारित अंदाज दिला जाणार आहे.

शुक्रवारी भारताच्या रिझव्‍‌र्ह बँकेने असे म्हटले होते की, आर्थिक विकास दर सध्याचे मंदीसदृश वातावरण बघता ६.९ टक्क्यांच्या आधीच्या अंदाजाइतका राहणार नाही तर तो ६.१ टक्के राहू शकतो. नाणेनिधीच्या प्रमुख जॉर्जिएव्हा यांनी सांगितले की, पतधोरणाचा वापर हुशारीने करण्याची गरज असून आर्थिक स्थिरतेला प्राधान्य देणे गरजेचे आहे.

जगाची स्थिती..

२०१९ मध्ये जगातील नव्वद टक्के देशात आर्थिक वाढ कमी झाली आहे. जागतिक अर्थव्यवस्था मंदावल्याने अनेक देशांना फटका बसणार आहे. ही घसरण चालू असताना ४० उदयोन्मुख बाजारपेठा व विकसनशील अर्थव्यवस्था यांचा आर्थिक विकास दर पाच टक्क्यांपेक्षा अधिक राहणार आहे. त्यातील १९ देश आफ्रि केतील आहेत. अमेरिका व जर्मनीत बेरोजगारी ऐतिहासिक नीचांकी आहे. अमेरिका, जपान व युरोपात तरीही आर्थिक उलाढाली मात्र मंदावल्या आहेत, असे जॉर्जिएव्हा म्हणाल्या.

भारताला झळ..

भारत व ब्राझीलसारख्या मोठय़ा देशात या वर्षी मंदीसारखी परिस्थिती जास्त जाणवणार असून गेली अनेक वर्षे घोडदौड करणाऱ्या चीनच्या आर्थिक वाढीला लगाम बसणार आहे, असे जॉर्जिएव्हा यांनी नमूद केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 10, 2019 12:35 am

Web Title: global recession hit hard to india zws 70
Next Stories
1 पीएम- किसान योजनेशी आधार जोडणीला ३० नोव्हेंबपर्यंत मुदतवाढ
2 मॉब लिंचिंगविरोधात मोदींना पत्र लिहिणाऱ्या ५० सेलिब्रेटिंवरील देशद्रोहाचा गुन्हा रद्द
3 लाजिरवाणं : आर्थिक विषमतेच्या बाबतीत भारत जगात अव्वल स्थानी
Just Now!
X