माजी दिवंगत राष्ट्रपती व थोर वैज्ञानिक ए.पी.जे अब्दुल कलाम यांचे नाव एका जागतिक उपग्रहाला दिले जाणार आहे. पृथ्वी निरीक्षण व आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी ग्लोबल स्टॅट फॉर डीआरआर हा उपग्रह संयुक्त राष्ट्रांच्या माध्यमातून सोडला जाणार असून त्याला कलाम यांचे नाव दिले जाईल.
सीएएनइयूएसच्या अवकाश तंत्रज्ञान संघटनेचे ( कॅनडा, युरोप, अमेरिका व आशिया यांची संस्था) अध्यक्ष मिलिंद पिंपरीकर यांनी ही माहिती दिली. या संस्थेचे मुख्यालय कॅनडातील मॉंट्रियल येथे आहे. १९९९ मध्ये सीएएनइयूएस ही संस्था स्थापन झाली असून अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात सामुदायिक पातळीवर समस्या निर्मूलनाचा या संस्थेचा उद्देश आहे. आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी उपग्रहांचा उपयोग करण्याचे ठरवण्यात आले असून त्यासाठी हा नवीन उपग्रह सोडला जाणार आहे असे  पिंपरीकर यांनी सांगितले., संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक आपत्ती निवारण परिषदेच्या निमित्ताने जपानमध्ये सेंदाई येथे मार्च महिन्यात हा उपग्रह सोडण्याची घोषणा करण्यात आली होती. ग्लोबल सॅट उपग्रह जगातील आपत्ती व्यवस्थापन एकत्रित करता यावे तसेच पर्यावरणाचे नियोजनही करता यावे यासाठी उपयोगी पडणार आहे. त्या उपग्रहात अनेक संवेदक असून हवामान अंदाज व पूर, दुष्काळ, चक्रीवादळे, भूकंप व वणव्याच्या काळात माहिती पुरवण्याची व्यवस्था आहे. कलाम यांनी जी उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवली होती तीच या उपग्रहातून साध्य होत आहेत त्यामुळे यूएन ग्लोबलसॅट उपग्रहाचे नाव यूएन कलाम ग्लोबलसॅट असे करण्यात येणार आहे असे पिंपरीकर यांनी सांगितले. कलाम यांनी त्यांच्या वर्ल्ड स्पेस व्हिजन २०५० या पुस्तकात अवकाशशक्ती असलेल्या देशांनी माणसाच्या समस्यांवर म्हणजे नैसर्गिक आपत्ती, ऊर्जा, पाणीटंचाई, आरोग्य शिक्षण व हवामान अंदाज यावर तोडगा काढावा असे म्हटले होते.
या उपग्रहाला कलाम यांचे नाव दिल्याने वैज्ञानिक , अभियंते व अवकाश संशोधक यांना प्रेरणा मिळेल, असे पिंपरीकर यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान मोदी यांनी या अगोदर सार्क ( साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन) या संस्थेचा वेगळा उपग्रह सोडण्याची संकल्पना मांडली आहे. इतर देशांनी आतापर्यंत भारताच्या नेतृत्वाला साथ दिली आहे त्यामुळे या उपग्रहाला यूएन कलाम ग्लोबलसॅट असे नाव देण्याच्या प्रस्तावास संयुक्त राष्ट्रांची मंजुरी मिळेल अशी आशा आहे. येत्या २०१६ मध्ये संयुक्त राष्ट्रे व भारत यांची संयुक्त कार्यशाळाही आयोजित करण्यात आली असून त्याच्या अंमलबजावणीवर विचार चालू आहे. कलाम यांच्या नावाने सोडला जाणारा उपग्रह कमी खर्चाचा असेल व त्यातून मिळणारी माहिती वाटून घेतली जाईल.