युनिसेफच्या अहवालातील माहिती
जगातील २.३ अब्ज मुलांपैकी ६८ कोटी मुलांना हवामान बदलांचा फटका बसणार आहे. जागतिक तापमानवाढीमुळे या मुलांना मृत्यू, दारिद्रय़ व रोगराई या परिणामांना तोंड द्यावे लागेल, असा इशारा संयुक्त राष्ट्रांच्या युनिसेफ या संस्थेने दिला आहे.
जगातील ५३ कोटी मुले जागतिक तापमानवाढीने परिणाम झालेल्या भागात राहतात. त्यात पूर व उष्णकटीबंधीय वादळांचा समावेश होतो. यातील बहुतांश भाग हे आशियातील आहेत. १६ कोटी मुले ही तीव्र दुष्काळ असलेल्या भागात राहत आहेत. त्यात मुख्यत्वे आफ्रिकेचा समावेश आहे, असे ‘अनलेस वुई अ‍ॅक्ट नाऊ’ या युनिसेफच्या अहवालात म्हटले आहे.
मुलांना हवामान बदलांचा फटका बसत आहे, त्यांच्यावर आधीच परिणाम होण्यास सुरुवात झाली, असे युनिसेफचे धोरण तज्ज्ञ निकोलस रीज यांनी म्हटले आहे. हवामान बदलांना तोंड देणाऱ्या मुलांची संख्या खूप जास्त आहे. अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा व चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग हे पॅरिस येथे पुढील आठवडय़ात होत असलेल्या हवामान परिषदेत गेल्या वीस वर्षांत प्रथमच हवामान बदलाबाबत करार घडवण्याचा प्रयत्न करणार आहेत. जागतिक पातळीवर विविध देशांनी हरितगृह वायूंचे प्रमाण कमी करणे आवश्यक असून देशपातळीवरही उपाययोजना करणे गरजेचे आहे. हवामान बदलांचा मुलांवर परिणाम सुरू झाला असला, तरी त्यांना शाळेत जाण्याबरोबरच त्यांचे आरोग्यही सांभाळावे लागणार आहे. मुलांना रोग होण्याची भीतीही जागतिक तापमानवाढीमुळे असते. त्यात मलेरिया, न्यूमोनिया, अतिसार, कुपोषण यांचा धोका असतो. उष्णतेच्या लाटांमुळे लहान बाळांमध्ये मृत्यू होण्याची शक्यता अधिक असते, त्यात शरीरातील पाणी कमी होणे, थकणे, हातापायात वेदना होणे असेही परिणाम शक्य असतात. दुष्काळाचा परिणाम शेतीवर होत असून परिणामी कुपोषण व कमी पोषण असे परिणाम होत आहेत. विशेष करून पाच वर्षांच्या खालील मुलांमध्ये हा परिणाम दिसून येतो.
१६ कोटी मुले दुष्काळी भागात राहतात, त्यातील ५ कोटी मुले अशा देशात राहतात, जेथे कुटुंबांचे उत्पन्न दिवसाला ४ डॉलरपेक्षा कमी आहे. हवामान बदलांमुळे असमानता आणखी वाढत जाते. पूर व दुष्काळात गरीब मूल व श्रीमंत मूल यांना सारख्या संधी असून शकत नाहीत.