आंतरराष्ट्रीय अहवालावर ‘सीएसई’चे मत

नवी दिल्ली : जागतिक तापमानवाढीचा आणि प्रदूषणाचा भारतावर मोठा परिणाम होऊ शकतो, असे मत सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंट (सीएसई) या संस्थेने संयुक्त राष्ट्रांच्या इंटर-गव्हर्नमेंटल पॅनेल फॉर क्लायमेट चेंज (आयपीसीसी) या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या ताज्या अहवालावर व्यक्त केले आहे.

आताचा प्रदूषणाचा दर आणि अन्य कारणांमुळे २०३० ते २०५० सालापर्यंत जगाचे तापमान १.५ अंश सेल्सिअसने वाढेल, असे आयपीसीसीने त्यांच्या अहवालात म्हटले आहे. त्यावर भाष्य करताना सीएसईने म्हटले की, जगाचे तापमान १ अंश सेल्सिअसने वाढल्यास त्याचे मोठे परिणाम भारतावर होणार होते. ते जर १.५ अंशांनी वाढले तर गंभीर परिणाम होतील. पृथ्वीचे तापमान २ अंश सेल्सिअसने वाढले तर ते खूपच धोकादायक असेल.

भारतासारख्या मोठय़ा किनारपट्टीच्या देशाला हिमनग वितळून समुद्राची पातळी वाढल्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. त्यासह अतिवृष्टी, वादळे, उष्णतेची लाट, दुष्काळ असे परिणामही अधिक जाणवतील, असे सीएसईने म्हटले आहे.

ही परिस्थिती निवारण्यासाठी अमेरिकेचा मोठा अडसर आहे. भारताने हवामान बदलाच्या विषयावर ठोस भूमिका घेतली पाहिजे, असेही सीएसईचे म्हणणे आहे.