ई-मेल पाठवत असताना अनेकदा चुकीच्या पत्त्यावर किंवा अर्धवट पाठविला गेल्याचा अनुभव सर्वाना कधी ना कधी येतो. यामुळे होणारे घोळ लक्षात घेऊन जी-मेलने असे ई-मेल परत घेण्याची सोय केली आहे.
ही सुविधा सहा वर्षांपूर्वीच गुगलने विकसित केली होती. मात्र ती गुगलच्या कर्मचाऱ्यांपुरतीच मर्यादित होती. पहिल्यांदा ही सेवा जी-मेलच्या अ‍ॅपवर ठेवण्यात आली होती. आता ती वेबवरही उपलब्ध करण्यात आली आहे. याद्वारे मेल पाठविल्याच्या ३० सेकंदांत तो परत मिळवता येणार आहे. यामुळे होणारा गोपनीयतेचा भंग, खासगी माहिती दुसऱ्याच्या हातात पडणे आदी प्रकार थांबणार आहेत. अनेकदा अशी वेळ नेहमी ई-मेलची सुविधा वापरून कामकाज चालणाऱ्या कंपन्या किंवा व्यक्तींवर येते.
ई-मेल पाठविल्यानंतर पाच ते तीस सेकंदांच्या आत ‘अनडू सेंड’ नावाच्या बटनावर क्लिक केल्यास हा मेल परत मिळणार आहे. ही सुविधा सुरू करण्यासाठी ‘सेटिंग’मध्ये जाऊन योग्य पर्याय निवडावा लागणार आहे.