नवी दिल्ली : जी-मेलच्या सेवांमध्ये गुरुवारी जगभरात अडथळे जाणवले. मात्र आता हे अडथळे दूर झाले असल्याचे गूगलने म्हटले आहे.

लॉग-इन न करता येणे, अटॅचमेंट जोडता न येणे आणि संदेश न मिळणे अशासारख्या समस्या गुरुवार सकाळपासून वापरकर्त्यांना जाणवत होत्या. गूगलच्या विविध सेवांबाबत ‘परफॉर्मन्स इन्फर्मेशन’ पुरवणाऱ्या जी-सूट डॅशबोर्डवर कंपनी जी-मेलबद्दलच्या अडथळ्यांचा तपास करत असल्याचे म्हटले होते. गूगलच्या प्रवक्त्याशी संपर्क साधला असता, आता ही समस्या दूर झाल्याचे त्याने सांगितले.

‘वापरकर्त्यांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही क्षमाप्रार्थी आहोत आणि तुमच्या संयमाबद्दल तुमचे आभारी आहोत. यंत्रणेच्या विश्वासार्हतेला गूगलचे सर्वोच्च प्राधान्य आहे. आमची यंत्रणा आणखी चांगली करण्यासाठी आम्ही सतत सुधारणा करत आहोत’, असे कंपनीने ताज्या ‘अपडेट’मध्ये नमूद केले. गूगल ड्राइव्ह, गूगल डॉक्स आणि गूगल मीट यांसारख्या इतर गूगल सेवाही पुन्हा सुरळीत करण्यात आल्याचे डॅशबोर्डवर सांगण्यात आले. किती आणि नेमक्या कुठल्या वापरकर्त्यांना समस्या जाणवल्या हे गूगलने सांगितले नसले, तरी भारतासह जगभरातील वापरकर्त्यांना या अडथळ्यांचा अनुभव आल्याचे कळते.