करोना व्हायरच्या वाढत्या प्रादुर्भावाचा परिणाम आता रोजगारांवरही दिसू लागला आहे. स्वस्त उड्डाणांसाठी परिचयाच्या असलेल्या गो एअर या कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांना विना वेतन सुट्टीवर जाण्याचे आदेश दिले आहेत. याव्यतिरिक्त सरकारी विमान कंपनी एअर इंडियानं आपल्या क्रू अलाव्हंस आणि फ्युअल रिअंबर्समेंटमध्ये १० टक्क्यांची कपात केली आहे. कंपनीचा खर्च कमी करण्यासाठी हे पाऊल उचलल्याची माहिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक (आर्थिक) एस.के.सिंह यांनी दिली. याव्यतिरिक्त वैमानिकांना देण्यात येणारा एन्टरटेममेंट अलाव्हन्सही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गोएअरकडून कर्मचाऱ्यांना विना वेतन सुट्टीवर पाठवण्याचा निर्णय कमी कालावधीत कंपनीची स्थिती टिकवून ठेवण्यासाठी घेतला असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं. याव्यतिरिक्त करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना काम करण्याच्या जागेपासून दूर ठेवण्यासाठी हे पाऊल उचलल्याचं कंपनीनं म्हटलं आहे.

हॉटेल क्षेत्रावरही परिणाम
करोनाच्या पार्श्वभूमीवर हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांची संख्या कमी झाली आहे. अशातच या क्षेत्रात कर्मचाऱ्यांची कपात होण्याची शक्यत वर्तवण्यात येत आहे. हॉटेल क्षेत्रानुसार करोनामुळे त्यांच्या उत्पन्नात ६० टक्क्यांची घट झाली आहे. तसंच ऑनलआईन ऑर्डरमध्येही २० टक्क्यांची घट झआली आहे.