राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपटनिर्माते अदूर गोपालकृष्णन यांनी धर्माच्या नावावर हिंसा पसरवणाऱ्यांवर टिका केल्यानंतर केरळमधील भाजपाच्या नेत्यांनी अदूर यांच्यावर टिका केली आहे. जर अदूर यांना ‘जय श्रीराम’च्या घोषणा सहन होत नसतील तर ते चंद्रावर किंवा इतर दुसऱ्या ग्रहावर जाण्यासाठी स्वतंत्र आहेत अशी टिका केरळ भाजपाचे प्रवक्ता बी. गोपाळकृष्णन यांनी केली आहे.

बी. गोपाळकृष्णन यांनी केलेल्या टिकेवरुन वाद झाल्यानंतर अदूर यांनी आपली बाजू स्पष्ट केली आहे. ‘पत्राच्या माध्यमातून मी जो आवाज उठवला आहे तो सरकारविरोधात किंवा जय श्रीरामच्या घोषणा देणाऱ्यांविरोधात नाही. हा आवाज त्या घटनांविरोधात आहे जिथे मारहाणीत एखाद्या व्यक्तीची हत्या केली जाते. या घटनांदरम्यान या जयघोषांचा वापर युद्धाच्या घोषणांसारखा केला जातो त्याविरोधात मी आवाज उठवला आहे,’ असं अदूर यांनी स्पष्ट केलं आहे.

काय म्हणाले बी. गोपाळकृष्णन

आपल्या फेसबुक पोस्टमध्ये बी. गोपाळकृष्णन म्हणतात, ‘अदूर एक प्रतिष्ठित निर्माते आहेत. मात्र ते देशाच्या संस्कृतीचा अपमान करण्याचा हक्क त्यांना नाही. जर हे (जय श्रीराम च्या घोषणा) ऐकण्याची इच्छा त्यांना नसेल तर त्यांनी स्वत:चे नाव श्रीहरीकोट्टामध्ये नोंदवावे आणि चंद्रावर जावे.’ तसेच ‘आज गांधीजी जिवंत असते तर ते अदूर यांच्या घरासमोर उपोषणाला बसले असते’ असा टोलाही गोपाळकृष्णन यांनी या पोस्टमधून लगावला आहे.

मुख्यमंत्री पिनराई विजयन आणि मल्याळम सिनेसृष्टीतील अनेकांनी अदूर यांचे समर्थन केले आहे. त्याचवेळी भाजपाच्या प्रवक्त्यांनी घेतलेल्या टोकाच्या भूमिकेवरही अनेकांनी नाराजी व्यक्त करत टिका केली आहे.