करोना संकटकाळात गोव्यातील सत्ताधारी भाजपाच्या आमदाराने दारु पार्टी केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये बार्देस तालुक्यातील हळदोणा मतदारसंघाचे आमदार ग्लेन टिकलो हे ‘मद्य पार्टीत’ सहभागी झालेले दिसले. याप्रकरणाची चौकशी करणार असल्याचं गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले आहेत.

आमदार ग्लेन टिकलो व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या दारु पार्टीचा हा व्हिडिओ रविवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. पार्टीदरम्यान मास्क व सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं उल्लंघन झालेलं दिसत आहे. ‘ही लॉकडाउन पार्टी’ आहे असं म्हणतानाही या व्हिडिओमध्ये ऐकायला येतंय. दारुच्या बाटल्या हातात घेऊन काही नाचताना दिसत आहेत. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गोवा काँग्रेसने यावरुन जोरदार टीका केली होती, तसेच नियमांचं उल्लंघन करणाऱ्या आमदारावर मुख्यमंत्री कारवाई करणार का असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या घटनेची चौकशी केली जाईल असं सांगितलं आहे. राज्याचे मंत्री मायकल लोबो यांनीही नॉर्थ गोवा प्रशासनाने खासगी पार्टीसाठी परवानगी दिली नसल्याचं स्पष्ट केलं. तसेच या प्रकरणी कारवाई केली जाईल असं सांगितलं.


दरम्यान, सोशल मीडियावर हा ५१ सेकंदांचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.