गोव्याच्या मंत्रिमंळाने बुधवारी राज्यातील कॅसिनोंना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १ नोव्हेबरपासून गोव्यातील कॅसिनो पुन्हा सुरू होत आहेत. मात्र, करोना संसर्ग रोखण्याच्यादृष्टीने कॅसिनो चालकांना सर्व नियमांचे व मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे लागणार आहे.

गोव्यात सुमद्र किनाऱ्यापासून काही अंतरावर सहा व किनारपट्टीवर डझनभर कॅसिनो आहेत. जे मार्चमध्ये करोना लॉकडाउन सुरू झाल्यापासून बंद होते.

या संदर्भात कॅबिनेटच्या बैठकीनंतर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी माध्यमांना माहिती देताना म्हटले की, ”१ नोव्हेंबरपासून राज्यातील कॅसिनो पुन्हा सुरू करण्याचा राज्य मंत्रिमळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.”

या कॅसिनोंना ५० टक्के क्षमतेसह सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच, राज्याच्या गृह मंत्रालयाने ठरवून दिलेल्या सर्व नियमांचे त्यांना पालन करावे लागणार आहे. तसेच, कॅसिनो चालकांना कॅसिनो सुरू करण्या अगोदर त्यांचे परवाना शुल्क भरावे लागणार असल्याचेही मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले आहे.

लॉकडाउनच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आता अनलॉक प्रक्रियेअंतर्गत राज्याची अर्थव्यवस्था सुरळीत करणयाच्या पार्श्वभूमीवर हळूहळू विविध उद्योग व पर्यटन उपक्रमांना पूर्ववत केले जात आहे. पर्यटन व्यवसाय हा गोव्यातील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी एक महत्वाचा स्त्रोत मानला जातो.