आजारी असलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना शनिवारी रात्री पुन्हा एकदा गोवा मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात (जीएमसीएच) दाखल करण्यात आले आहे. मुख्यमंत्री कार्यालयाच्या माहितीनुसार मुख्यमंत्री पर्रिकरांना गॅस्ट्रोइंटेस्टाइनल एंडोस्कोपीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान त्यांच्या काही चाचण्या करण्यात येणार आहे. मात्र, त्यांचा प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

पुढील ४८ तासांच्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांना ठेवण्यात आले आहे. रुग्णालयाबाहेर मोठ्या प्रमाणावर सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान, पर्रिकर यांना व्हॅटिंलेटरवर ठेवण्यात आल्याची चर्चा सुरु होती. मात्र, शनिवारी दुपारी पर्रिकरांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्यानंतर गोव्याचे वरिष्ठ मंत्री विजय सरदेसाई यांनी या चर्चांचे खंडन केले आहे.

मुख्यमंत्री वैद्यकिय निरिक्षणाखाली आहेत. काळजी करण्याचे काहीही कारण नाही. दोन दिवसांसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना आम्ही उपचारांसाठी स्वतंत्र रुममध्ये ठेवले आहे. डॉक्टरांना त्यांच्या काही चाचण्या करायच्या असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. मुख्यमंत्री लढाऊ आहेत. एक दिवसानंतर त्यांना पुन्हा घरी नेण्यात येईल, असे गोव्याचे आरोग्य मंत्री विश्वजित राणे सांगितले.

मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे स्वादूपिंडाच्या कर्करोगाशी लढत आहेत. त्यांनी यापूर्वी गोवा, मुंबई, न्यूयॉर्क, दिल्ली येथील रुग्णालयांमध्ये उपचार घेतले आहेत.