साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असे मनोहर पर्रिकरांचे वर्णन करावे लागेल. त्यांच्यासारखा राजकारणी विरळाच. त्यांनी गोव्यासारख्या राज्यात भाजपची खिंड जिद्दीने लढवली. निष्ठा आणि साधेपणा यांचा संगम त्यांच्या ठायी होता. जीवघेण्या आजारपणातही त्यांनी मुख्यमंत्रिपद सांभाळले.

पर्रिकर १४ मार्च २०१७ पासून गोव्याचे मुख्यमंत्री होते. त्याआधी २००० ते २००५ आणि २०१२ ते २०१४ या काळात त्यांनी मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळली. भाजपच्या गोव्यातील अधिवेशनात २०१३ मध्ये पर्रिकर यांनीच पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला होता. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी देशाचे संरक्षण खाते (२०१४ ते २०१७) सांभाळले. उत्तर प्रदेशातून ते राज्यसभेवर निवडूनही आले होते.

पर्रिकरांचा जन्म १३ डिसेंबर १९५५ रोजी म्हापसा येथे झाला. मडगाव येथे लोयोला हायस्कूलमध्ये त्यांचे शिक्षण झाले. मराठी भाषेतून त्यांनी माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर १९७८ मध्ये मुंबई आयआयटीतून त्यांनी धातू अभियांत्रिकीतून पदवी घेतली. भारतीय राजकारणातील उच्च पदवीधर अशी त्यांची ओळख होती. तरुणपणातच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात दाखल झाले. तेथे मुख्य शिक्षकाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली. ‘आयआयटी’तून पदवी घेतल्यानंतर त्यांनी म्हापसा येथे संघाचे काम सुरू केले. सव्विसाव्या वर्षी ते संघचालक झाले. उत्तर गोव्यात ते संघाचे काम करीत राहिले. रामजन्मभूमी चळवळीत ते संघटक होते. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचा सामना करण्यासाठी संघाने त्यांना भाजपमध्ये आणले.

आपण संघ स्वयंसेवक असल्याचा पर्रिकर यांना अभिमान होता. संघातूनच आपण शिस्त, राष्ट्रवाद, सामाजिक जबाबदारी या गोष्टी शिकलो, असे ते सांगत असत. ‘सामान्यांचे मुख्यमंत्री’ म्हणून ते परिचित होते.

भाजपच्या उमेदवारीवर ते १९९४ मध्ये गोव्यात आमदार झाले. जून ते नोव्हेंबर १९९९ दरम्यान ते गोवा विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते. २४ ऑक्टोबर २००० रोजी ते गोव्याचे मुख्यमंत्री झाले आणि २७ फे ब्रुवारी २००२ पर्यंत ते या पदावर राहिले. ५ जून २००२ रोजी ते पुन्हा निवडून आले आणि मुख्यमंत्रीही बनले. २९ जानेवारी २००५ रोजी त्यांचे सरकार अल्पमतात आले. त्या वेळी चार भाजप आमदारांनी राजीनामा दिला होता. नंतर काँग्रेसचे प्रतापसिंह राणे मुख्यमंत्री झाले. २००७ मध्ये पर्रिकर यांच्या नेतृत्वाखालील भाजपचा काँग्रेसचे दिगंबर कामत यांनी पराभव केला. मार्च २०१२ मध्ये विधानसभा निवडणूक झाली आणि भाजप व मित्र पक्षांनी २४ जागा जिंकल्या. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत गोव्यातील दोन्ही जागा भाजपनेजिंकल्या. केंद्रात भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार आल्यानंतर पर्रिकर गोवा सोडण्यास तयार नव्हते, पण पंतप्रधान मोदी यांनी त्यांचे मन वळवले. त्यांच्या जागी गोव्यात लक्ष्मीकांत पार्सेकर यांना मुख्यमंत्री करण्यात आले. पर्रिकर केंद्रात संरक्षणमंत्री झाले. त्याआधी ते पणजी मतदारसंघाचे आमदार होते. केंद्रात मंत्री झाल्यावर ते उत्तर प्रदेशातून राज्यसभेवर निवडून आले. संरक्षण मंत्रालयातील निर्णयप्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणाची चौकशी त्यांनी सुरू केली. त्यानंतर पुन्हा पर्रिकर राज्यात आले. १४ मार्च २०१७ रोजी त्यांचा मुख्यमंत्रिपदी शपथविधी झाला. मनोहर पर्रिकर यांना राज्यात परत आणणार असाल, तरच भाजपला पाठिंबा देऊ, अशी भूमिका तेव्हा गोवा फॉरवर्ड पक्षाचे विजय सरदेसाई यांनी घेतली होती.

पर्रिकर यांनी २००१ मध्ये ५१ सरकारी शाळांचे रूपांतर विद्याभारतीत केले होते, त्यामुळे त्यांच्यावर टीका झाली होती. फिफा करंडकासाठी ब्राझीलला जाण्यासाठी त्यांनी तीन मंत्र्यांसह सहा आमदारांना ८९ लाख रुपये मंजूर केले त्यावरूनही वाद झाला होता. पाकिस्तानात जाणे म्हणजे नरकात जाण्यासारखे आहे, असे वादग्रस्त विधान त्यांनी केले होते. आमीर खान याने पत्नी किरण राव हिला देशात असुरक्षित वाटत असल्याचे विधान केल्यानंतर त्याचा पर्रिकरांनी त्यांच्या शैलीत समाचार घेतला. पण नंतर आपले विधान कुणा व्यक्तीला उद्देशून नव्हते, असे स्पष्ट केले होते.

त्यांच्या पत्नी मेधा यांचा २००१ मध्ये मृत्यू झाला. त्यांना उत्पल आणि अभिजात हे पुत्र आहेत. कर्करोगाचे निदान झाल्यानंतर त्यांनी काही काळ भारतात उपचार घेतले. नंतर ते उपचारांसाठी अमेरिकेलाही जाऊन आले. अखेपर्यंत पक्षाने त्यांना जबाबदारीतून मुक्त केले नाही, त्यांनीही पक्षावरच्या अविचल श्रद्धेपोटी मुख्यमंत्रिपद अखेपर्यंत सांभाळले आणि पक्षनिष्ठेला जिवापलीकडे जपले.