अन्नातून विषबाधा झाल्यामुळे अचानक प्रकृती बिघडल्याने माजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्याच्या त्यांच्या प्रकृतीबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.


बुधवारी रात्री अचानक पोटात दुखू लागल्याने पर्रिकर यांना अस्वस्थ वाटू लागले होते. त्यामुळे त्यांना गोव्याच्या जीएमसीएच रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, अधिक चांगल्या उपचारांसाठी त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात हालवण्याचा निर्णय त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी घेतल्याने त्यांना तत्काळ मुंबईला हालवण्यात आले.

वैद्यकीय तज्ञ्जांच्या सांगण्यानुसार, मुख्यमंत्री पर्रिकर यांना गुरुवारी संध्याकाळी उशीरा मुंबईत आणण्यात आले. त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरु करण्यात आले आहेत. मात्र, त्यांच्या प्रकृतीबाबत अद्याप अधिक माहिती देण्यात आलेली नाही.

गेल्याच आठवड्यात महानायक अमिताभ बच्चन यांना देखील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ‘ठग्ज ऑफ हिंदुस्तान’ या त्यांच्या सिनेमाचे सध्या मुंबईतील फिल्मिस्तान स्टुडिओत शुटींग सुरु आहे. येथे अतिकामामुळे थकवा आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बच्चन यकृताच्या आजाराने देखील त्रस्त आहेत.