गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना शनिवारी दुपारी दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. वैद्यकीय चाचणी केल्यानंतरच पर्रीकर यांच्यावर उपचाराला सुरुवात होईल.

पर्रीकर यांना स्वादूपिंडाशी संबंधित आजार असून यासाठी त्यांच्यावर अमेरिकेतील रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. ते ऑगस्टमध्ये मायदेशी परतले. मात्र, गुरुवारी त्यांची प्रकृती पुन्हा खालावली आणि त्यांना गोव्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

शनिवारी दुपारी पर्रीकर यांना विशेष विमानाने दिल्लीत नेण्यात आले. दिल्लीतील एम्स रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांची टीम आता पर्रीकर यांच्यावर उपचार करणार आहे. सुरुवातीला पर्रीकर यांची वैद्यकीय चाचणी केली जाईल. यानंतर पुढील उपचाराला सुरुवात होईल, असे सूत्रांनी सांगितले.

पर्रीकर यांची प्रकृती खालावत असतानाच दुसरीकडे गोव्यात भाजपामधील गोटात हालचाली वाढल्या आहेत. दिल्लीतून पक्षाचे निरीक्षक शनिवारी रात्री गोव्यात पोहोचणार असून गोव्यात पर्रीकर यांची जागा कोण घेणार, याबाबत ते मत जाणून घेतील. अंतिम निर्णय पक्ष नेतृत्वच घेईल, असेही सूत्रांनी नमूद केले. मनोहर पर्रीकर यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुख्यमंत्रीपदावर काम करु शकणार नाही, असे पक्षनेतृत्वाला कळवले होते. त्यानंतर गोव्यात भाजपा कोणाला संधी देणार, नेतृत्वबदलानंतरही मित्रपक्ष भाजपासोबतच राहणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.