सोशल मीडियावर वाद पेटला

”आता मुलीही दारु प्यायला सुरुवात केली आहे, याची भिती वाटते” असे वक्तव्य करणे गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना चांगलेच भोवले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे महिलांनी त्यांना चांगलेच सुनावले आहे. विशेषत: पर्रिकर यांच्यावर तरुणींनी चांगलाच निशाणा साधला आहे. त्यांच्याविरोधात सोशल मीडियावर विशेष मोहिम सुरु करण्यात आली आहे. यामध्ये #GirlsWhoDrinkBeer या हॅशटॅगचा वापर करुन आपला बिअरसोबतचा फोटो ट्विटरवर पोस्ट करत आहेत. हो आम्ही बिअर पितो असे या मुलींनी सांगितले आहे. विशेष म्हणजे या अभियानात तरुणींबरोबरच अनेक महिलांनीही सहभाग घेतला आहे.

ट्विटरवर या मुली पर्रिकर यांना टॅगही करत आहेत. इतकेच नाही तर अनेकींनी त्यात चिअर्स असेही लिहीले आहे. याशिवाय महिलांनो पिणे का थांबवावे? असा सवालही काहींनी व्यक्त केला आहे. पुरुषांनीही त्यांच्या या विधानाचा समाचार घेत आपला राग व्यक्त केला आहे. शुक्रवारी एका युवा संमेलनात युवकांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले. यावेळी त्याठिकाणी उपस्थित असणाऱ्या लोकांबाबत चर्चा करत नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी आपली विद्यार्थी दशेतील एक आठवणही सांगितली. ते म्हणाले, मी आयआयटीमध्ये होतो तेव्हा माझ्यासोबत शिकणारे विद्यार्थी गांजाची नशा करायचे तर काही विद्यार्थी पॉर्न चित्रपटही पहायचे, त्यामुळे ही आताची परिस्थिती नाही. पण आता मुलीही व्यसने करायला लागल्या आहेत आणि त्याची आपल्याला भिती वाटते या त्यांच्या पुढच्या विधानावरुन गदारोळ माजला आहे.