गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना उपचारासाठी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेसचे १४ आमदार सोमवारी सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपाल भवनात पोहोचले. राज्यपालांनी आम्हाला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण द्यावे, असे काँग्रेसचे म्हणणे असून राज्यपाल उद्या (मंगळवारी) काँग्रेसच्या आमदारांना भेटीसाठी वेळ देतील, अशी शक्यता आहे.

मनोहर पर्रिकर यांना स्वादुपिंडाच्या आजारावरील उपचारासाठी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. मनोहर पर्रिकर आजारी असताना गोव्यात नेतृत्व बदल होणार नाही, अशी भूमिका भाजपा प्रदेशाध्यक्षांनी रविवारी जाहीर केली. तर काँग्रेसनेही गोव्यात सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरु केल्या आहेत.

सोमवारी काँग्रेसचे १४ आमदार राजभवान पोहोचले. त्यांनी राज्यपालांच्या कार्यालयात पत्र दिले आहे. या पत्रात त्यांनी काँग्रेसला सत्ता स्थापनेसाठी संधी द्यावी, अशी विनंती करण्यात आली आहे. या पत्रावर १४ आमदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत. आम्हाला भाजपामधील काही आमदारही पाठिंबा देऊ शकतील. गोव्यात आम्हाला सत्तास्थापनेची संधी आहे, असा दावा काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे. मनोहर पर्रिकरांच्या अनुपस्थितीत काँग्रेस सरकार चालवण्यासाठी सक्षम असल्याचे नेते सांगतात.

गोवा विधानसभेत ४० जागा असून यात भाजपाचे १४ आमदार आहेत. मगोप व जीएफपीचे प्रत्येकी ३ आमदार आहेत. याशिवाय ३ अपक्ष आमदारांचाही भाजपाला पाठिंबा आहे. तर काँग्रेसकडे १६ आमदारांचे संख्याबळ असून राष्ट्रवादी काँग्रेसचा एक आमदार आहे.