१९ एप्रिल रोजी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोवा हे राज्य करोनामुक्त झाल्याची घोषणा केली होती. गोव्यात करोनाचे सात रुग्ण सापडले होते. त्यानंतर हे सातही रुग्ण पूर्णपणे बरे झाल्यानंतर त्यांनी ही घोषणा केली आहे. दरम्यान गोवा कसं करोनामुक्त झालं याची माहिती खुद्द प्रमोद सावंत यांनी दिली आहे. “३ एप्रिलनंतर गोव्यात एकही करोनाचा संसर्ग झालेला रुग्ण सापडला नाही. राज्यातील वैद्यकीय टीमनं उत्तम काम केलं आहे. तसंच करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिसांनीही मोलाची भूमिका साकारली. या सर्वांच्या प्रयत्नांमुळेच गोवा करोनामुक्त झालं,” असं मत सावंत यांनी व्यक्त केलं.

यावेळी त्यांनी मजुरांच्या स्थलांतरावरही भाष्य केलं. “गोव्यात आता करोनाचा एकही रुग्ण नाही. इतर राज्यांप्रमाणे गोव्यातूनही कामगांना आपल्या राज्यांमध्ये परतायचं नाही. पंरतु ५० टक्के असे कामगार आहेत ज्यांना आपल्या गावी परतायचं आहे. त्यांना आपापल्या गावांपर्यंत सुखरुप पोहोचवण्यासाठी सरकार उपाययोजना करत आहे,” असं प्रमोद सावंत म्हणाले. एका हिंदी वृत्तवाहिनीनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

“आम्ही गोव्यात येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचा सन्मान करतो. परंतु सध्या करोनाच्या प्रादुर्भावामुळे सध्या वेगळी परिस्थिती निर्माण झाली आहे. ही निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन आपल्याला सरकारनं दिलेल्या गाईडलाइन्सच पालन करायला हवं.” असंही ते म्हणाले.

मद्यविक्री सुरू होणार

“करोनामुळे गेल्या काही दिवसांपासून निर्बंध घालण्यात आले होते. तसंच लॉकडाउनमुळे अनेकजण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांवरही जाऊ शकत नव्हते. तसंच राज्यातील मद्यविक्रीही बंद ठेवण्यात आली होती. परंतु ग्रीन झोनमध्ये सरकारनं जी सुट दिली आहगे ती आता या ठिकाणीही लागू होईल,” असं सावंत म्हणाले.

अधिकृत आकडेवारीनुसार गोव्यामध्ये ७५८ जणांची करोना चाचणी घेण्यात आली होती. त्यापैकी सात जणांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झालं होतं. या सातही जणांवर उपचार करुन त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. राज्यामध्ये ३ एप्रिल रोजी करोनाचा शेवटचा रुग्ण अढळून आला होता. त्यानंतर राज्यात एकही नवा रुग्ण अढळून आलेला नाही.