लष्कर-ए-तोयबाकडून गोव्यावर हल्ला होण्याची शक्यता असल्याची खबर गुप्तचर यंत्रणांनी दिल्याने गोव्यात सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी, असा इशारा देण्यात आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला असला तरी तो सर्वसामान्य इशारा असल्याचे म्हटले आहे.
गुप्तचर यंत्रणांचा इशारा केवळ गोव्यासाठी नसून तो सर्वसामान्य स्वरूपाचा आहे, असे पर्रिकर म्हणाले. बंदरांवरील अधिकारी, नौकानयन विभागाशी संबंधित खात्याचे अधिकारी यांनी मच्छीमारांना सावधानतेचा इशारा दिला आहे.
केवळ मच्छीमारच नव्हे तर समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या कॅसिनोनांही सावध करण्यात आले आहे. भारतीय तटरक्षक दल आणि नौदल यांच्याशी पोलिसांनी समन्वय ठेवला आहे. महाराष्ट्रातील कोकण क्षेत्रातही सावधानतेचा इशारा दिला आहे.