गोव्यात काँग्रेसच्या १० आमदारांनी भाजपात प्रवेश करण्यावरुन राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा मुलगा उत्पल पर्रीकर यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. माझ्या वडिलांच्या निधनानंतर पक्षाने दुसरा मार्ग स्विकारला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. भाजपा पक्षातून आता विश्वास आणि वचनबद्धता सारखे शब्द संपले आहेत अशी टीका उत्पल पर्रीकर यांनी केली आहे.

पीटीआयशी बोलताना उत्पल पर्रीकर यांनी म्हटलं आहे की, “माझे वडील जिवंत असताना पक्षात विश्वास आणि वचनबद्धता सारख्या शब्दांना महत्त्व होतं. ही पक्षाची मुल्यं होती. पण १७ मार्चनंतर दोन्ही शब्द पक्षातून गायब झाले आहेत. १७ मार्चनंतर पक्षाने भलतीच दिशा पकडली आहे. आता काय योग्य आहे हे वेळच सांगेल ?”. १७ मार्च रोजी गोव्याचे मुख्यमंत्री आणि भाजपा नेता मनोहर पर्रीकर यांचं निधन झालं.

गोवा विधानसभेत काँग्रेसचे १५ आमदार आहेत. यामधील १० आमदार बुधवारी भाजपात सहभागी झाले. त्यांनी बुधवारी विधानसभा अध्यक्षांना आपल्या राजीनाम्याची माहिती दिली.

काँग्रेसचे १० आमदार सहभागी झाल्यानंतर ४० सदस्यांच्या गोवा विधानसभेत भाजपाचे २७ आमदार झाले आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं आहे की, “काँग्रेसचे १० आमदार भाजपात सहभागी झाले आहेत. राज्य आणि आपल्या क्षेत्राचा विकास करण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचललं आहे. यासाठी त्यांनी कोणतीही अट ठेवली नाही. कोणत्याही अटीविना ते भाजपात सहभागी झाले आहेत”.