विविध महिला संघटनांनी निषेध नोंदविल्यानंतर राज्यातील दारूचे बार पहाटे चापर्यंत खुले ठेवण्याच्या परवानगीचा निर्णय गोवा सरकारने स्थगित ठेवला आहे. या संदर्भात राज्य सरकारने गेल्या आठवडय़ात अधिसूचना जारी करून बार पहाटे चार वाजेपर्यंत खुले ठेवण्याची अनुमती दिली होती. परंतु आता मध्यरात्री १२ वाजेपर्यंतच बार खुले ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांना ही माहिती दिली. अलीकडेच काही महिला संघटनांनी या निर्णयाविरोधात पत्रकार परिषद घेऊन दंड थोपटले होते. मात्र, त्यांनी राज्य सरकारकडे तशी कधी मागणी केलेली नव्हती, असे सांगत त्यांच्यापैकी काही महिला कार्यकर्त्यांना प्रसारमाध्यमांकडून मिळणाऱ्या प्रसिद्धीत रस असावा, असा टोला पर्रिकर यांनी मारला. माध्यमांकडे जाण्यापूर्वी या महिला संघटनांनी सरकारकडे यायला हरकत नव्हती, असेही ते म्हणाले. अर्थात, महिलागटांनी उपस्थित केलेले मुद्दे आपल्याला तत्त्वत: मान्य आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. याआधीच्या काँग्रेसी राजवटीत गोव्यातील बारना पहाटे पाचपर्यंत सुरू ठेवण्याची अनुमती होती परंतु या महिला संघटनांनी त्याविरोधात कधी निषेध नोंदविला नव्हता, याकडेही पर्रिकर यांनी लक्ष वेधले.
 राज्यातील बार आणि रेस्टॉरण्ट्स पहाटे चार वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची देण्यात आलेली परवानगी पुढील निर्णय होईपर्यंत स्थगित ठेवण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना आपण अशा प्रकारच्या परवानगीचे सूतोवाच केले होते, असे पर्रिकर म्हणाले.
राज्यातील पर्यटनास उत्तेजन देण्यासाठीच जादा अबकारी कर आकारून शहरी तसेच किनारपट्टीवरील बार व रेस्टॉरण्ट्स पहाटे चार वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती, असेही त्यांनी सांगितले.
राज्य सरकार आता एक छाननी समिती स्थापन करणार असून काही बारना अशी परवानगी देण्याच्या प्रस्तावावर विचार करणार आहे. त्याआधी कायदा आणि सुव्यवस्थेसंबंधी त्यांचा मागील तपशील तपासून बघण्यात येईल आणि अशा बारचे स्थान बघून त्यांना तशी परवानगी देण्यासंबंधी ही समिती निर्णय घेईल, अशी माहिती पर्रिकर यांनी दिला.