स्थानिक आणि जागतिक स्तरावरील गुंतवणूकदारांना आपल्याकडे आकर्षित करून घेण्यासाठी राज्यात विशेष गुंतवणूक विभाग स्थापन करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. राज्यात परप्रांतीयांची घुसखोरी होण्याच्या भीतीने मागील काँग्रेस सरकारने विशेष आर्थिक विभाग (एसईझेड) रद्दबातल ठरविले होते. त्या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या सरकारने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
सर्व स्तरांवरील गुंतवणूकदारांना आकृष्ट करण्यासाठी विशेष गुंतवणूक विभाग स्थापन करण्यात येत असून, गुंतवणूक तथा औद्योगिक धोरणासंबंधीचा मसुदा राज्य सरकारने तयार केला असल्याची माहिती राज्याच्या औद्योगिक विभागातील अधिकाऱ्यांनी सोमवारी दिली.
विशेष गुंतवणूक विभागांद्वारे जागतिक स्तरावरील गुंतवणूकदार गोव्यात आकृष्ट होतील, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. उद्योजकांनी राज्यात गुंतवणूक वाढवावी म्हणून लघु आणि मध्यम उद्योगांसाठी एक खिडकी योजना लागू करण्याचाही निर्णय घेण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.