गोवा सरकारच्या गोवा मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल या संस्थेत उपचारासाठी दाखल केलेले अनेक रुग्ण प्राणवायू अभावी दगावलेले असताना तसे काहीही घडले नसून प्राणवायू अभावी करोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यू झालेच नाहीत, अशा शब्दात आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी घूमजाव केले आहे.

विधानसभेत त्यांनी याप्रकरणी वक्तव्य करताना प्राणवायूअभावी मृत्यू झाल्याचा इन्कार केला. केंद्र सरकारनेही देशात प्राणवायू अभावी कुणाचा मृत्यू झाल्याची नोंद आमच्याकडे आली नाही असा पवित्रा नुकताच घेतला होता, त्यावर विरोधकांनी आगपाखड केली होती. विधानसभेत राणे यांनी शुक्रवारी असे सांगितले, की प्राणवायूअभावी एकाही करोना रुग्णाचा गोवा मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल या संस्थेत मृत्यू झालेला नाही. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी सभागृहात विचारलेल्या प्रश्नावर ते उत्तर देत होते.

लेखी उत्तरात राणे यांनी म्हटले आहे, की गोवा मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल या संस्थेत  प्राणवायूचा पुरवठा कधीही संपलेला नव्हता. त्यामुळे प्राणवायूने कुणाचा मृत्यू होण्याचा प्रश्नच येत नाही. ११ मे रोजी राणे यांनी असे म्हटले होते, की  गोवा मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल या संस्थेत  प्राणवायूअभावी २६ जणांचा मृत्यू झाला. त्या वेळी राणे असेही म्हणाले होते, की ११ मे रोजी पहाटे २ ते ६ दरम्यान रुग्णालयातील प्राणवायू संपल्याने काही रुग्णांचे प्राण गेले.   दरम्यान,  गोव्यात शुक्रवारी करोना रुग्णांची संख्या १ लाख ७१ हजार ५२ झाली असून मृतांचा आकडा ३१४६ झाला आहे.