बिहारमध्ये माध्यान्ह भोजन योजनेत सारण जिल्ह्य़ात झालेल्या विषबाधेच्या घटनेत अनेक मुलांचा मृत्यू झाल्यानंतर आता गोवा सरकारने या योजनेचा फेरआढावा घेण्याचे ठरवले आहे. आता अन्नातून विषबाधा टाळण्यासाठी अधिक कडक निकष तयार केले जाणार आहेत. अन्न शिजवले जाते त्या ठिकाणांची पाहणी केली जाणार आहे, त्यात काही दोष आढळले तर प्रसंगी ही योजना तात्पुरती स्थगित केली जाण्याची शक्यता आहे.
अन्नातून विषबाधा टाळण्यासाठी या योजनेतील अन्न कसे असावे, त्याचे वाटप कसे करावे, जबाबदारी कुणाची असावी याबाबत गोवा सरकार कडक नियमावली तयार करीत आहे. त्यामुळे फेरआढाव्यासाठी ही योजना तूर्त बंद ठेवली जाणार आहे.
राज्याचे शिक्षण संचालक अनिल पोवार यांनी सांगितले की, या योजनेचा आम्ही फेरआढावा घेत असून त्यात माध्यान्ह भोजन तयार करणाऱ्या स्वमदत गटांच्या स्वयंपाकघरांची आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीने पाहणी करण्यात येणार आहे. राज्यात किमान ८० स्वमदत गट माध्यान्ह भोजन तयार करण्याचे काम करतात. या संपूर्ण योजनेचा फेरआढावा घेण्यात येत असून त्यात जर अनारोग्यकारक बाबी निदर्शनास आल्या तर ही योजना तात्पुरत्या स्वरूपात थांबवली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाला अन्न तयार होते त्या ठिकाणी नियमितपणे भेटी देण्यास सांगण्यात आले आहे.
या वर्षी दिवाळीपर्यंत या योजनेत सुधारणा करण्याची घोषणा मुख्यमंत्री मनोहर र्पीकर यांनी केली असून येत्या २४ जुलै रोजी पोरवोरिम येथे शिक्षण संचालनालयात स्वमदत गटांची बैठक बोलावण्यात आली आहे. विविध संस्थांकडून येणाऱ्या प्रतिसादानंतर या योजनेबद्दल निर्णय घेतला जाणार आहे. स्वमदत गटांच्या प्रतिनिधींना याबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे.