गोव्याचे कृषीमंत्री विजय सरदेसाई यांनी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची तुलना थेट येशू ख्रिस्ताशी केली आहे. मनोहर पर्रिकर यांनी येशू ख्रिस्ताप्रमाणे पूल बांधले भिंती नाही असं विजय सरदेसाई यांनी म्हटलं आहे. ते म्हणालेत की, ‘बायबलमध्ये सांगितलं आहे की मानवाने भिंती नाही तर पूल उभारले पाहिजेत. येशू ख्रिस्ताने पूल बांधले भिंती नाही. तुम्ही पूल बांधणं गरजेचं आहे. मनोहर पर्रिकर ती व्यक्ती आहे जी पूल बांधते’.

विधानसभेत मनोहर पर्रिकरांसाठी मांडण्यात आलेला अभिनंदन ठराव मंजूर झाल्यानंतर बोलताना विजय सरदेसाई यांनी हे वक्तव्य केलं. भाजपा आमदार राजेश पाटणेकर यांनी हा ठराव मांडला होता. मांडवी नदीवर यशस्वीपणे अटल सेतू पुलाचं काम पूर्ण झाल्यामुळे हा अभिनंदन ठराव मांडण्यात आला होता. पर्रिकरांच्या हस्ते रविवारी या पुलाचं उद्धाटन करण्यात आलं. नव्याने बांधण्यात आलेला हा पूल मांडवी नदीवरील तिसरा पूल असून ५.१ किमी लांबीचा, चार पदरी तसेच केबलधारीत आहे.

गुरुवारी मनोहर पर्रिकर तपासणीसाठी दिल्लीमधील एम्स रुग्णालयात जाणार आहेत. कॅन्सरशी लढा देत असलेल्या पर्रिकरांच्या काही चाचण्या येथे घेतल्या जातील. याआधी त्यांनी मुंबई आणि न्यूयॉर्कमध्ये जाऊन उपचार घेतले आहेत. शनिवारी संध्याकाळी पर्रिकर गोव्याला परतणार आहेत.