गोव्याचे नूतन मुख्यमंत्री म्हणून प्रमोद सावंत यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. प्रमोद सावंत हे सध्या गोवा विधानसभेचे अध्यक्ष आहेत. दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे ते अत्यंत निकटवर्तीय होते, असेही सांगितले जाते. प्रमोद सावंत हे गोव्यातील सांखळी मतदार संघाचे भाजपाचे आमदार आहेत. डॉ. प्रमोद सावंत यांचा जन्म २४ एप्रिल १९७३ रोजी झाला. डॉ. प्रमोद सावंत हे व्यवसायाने आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. त्यांनी कोल्हापूर येथील गंगा शिक्षण संस्था येथून आयुर्वेदाची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी पुण्याच्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून समाजसेवेत पदव्युत्तर पदवी घेतली. त्यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत या रसायनशास्त्राच्या शिक्षिका असून सध्या त्या गोव्याच्या भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा ही आहेत.

गतवर्षी सप्टेंबरमध्ये काँग्रेसने प्रमोद सावंत यांना विधानसभा अध्यक्षपदावरुन हटवण्यासाठी नोटीस दिली होती. भाजपा सरकार अल्पमतात असल्याचा दावा काँग्रेसने केला होता.

प्रमोद सावंत हे कोट्यधीश असून त्यांच्याकडे ३.६६ कोटींची संपत्ती आहे. सावंत यांच्याकडे पाच लक्झरी कार आहेत. गुंतवणुकीतही सावंत हे आघाडीवर आहेत. त्यांनी बाँड्स, डिबेंचर्स, शेअर, पोस्टल बचतीसह इतर ठिकाणी १.१६ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. सावंत यांच्याकडे ६२ लाख रुपये किमतीची शेतजमीन आहे. तर अकृषक जमिनीची किंमत १५ लाख रुपये आहे. निवासी इमारतीची किंमत ८५ लाख रुपये आहे.