गोव्यात भर समुद्रातून शस्त्रास्त्रे वाहून नेणारे जहाज फुटल्यामुळे ही शस्त्रे किनाऱ्यावर वाहून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळेच गोवा किनारपट्टीवर अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. मे. मित्सुई ओसाका लाइन्स जपान या कंपनीचे एम. व्ही. मोल कम्फर्ट हे कंटेनरवाहू जहाज कोलंबोहून जेद्दाह येथे निघाले होते. या जहाजावर, ४२६८ कंटेनर चढविण्यात आले होते. मात्र भर समुद्रात, हे जहाज दुभंगले. २४ जून रोजी या जहाजाचा एक भाग गोवा समुद्रकिनाऱ्यापासून ५३० मैल अंतरावर आढळला. हा भाग २.५ नॉट वेगाने वाहत येत होता. या जहाजात शस्त्रास्त्रे असल्यामुळे एखादा शस्त्रास्त्र असलेला कंटेनर गोव्याच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.