गोव्यातील खाण उद्योग त्वरित सुरू करावा, या मागणीसाठी गोवा मायनिंग पीपल्स फ्रण्टने गोव्यातील खाणपट्टय़ात एक आठवडा बंद पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात मोठय़ा प्रमाणावर बेकायदा खाण उत्खनन करण्यात येत असल्याबद्दल जनहितार्थ याचिका दाखल करण्यात आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने खाण उत्खननाला स्थगिती दिली आहे.
गोवा मायनिंग पीपल्स फ्रण्टच्या पदाधिकाऱ्यांची शनिवारी येथे बैठक झाली, त्यामध्ये २१ ते २८ ऑगस्ट या कालावधीत बंद पुकारण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रत्येक तहसीलमध्ये दरदिवशी बंद पुकारण्यात येणार आहे. संपूर्ण आंदोलन शांततापूर्ण मार्गाने करण्यात येणार असल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आले.
गणेशोत्सवानंतर गोव्यातील खाण उद्योग त्वरेने सुरू करण्यात यावे, अशी मागणी रेटण्यासाठी २९ ऑगस्ट रोजी एक मेळावाही आयोजित करण्यात येणार असल्याचे फ्रण्टचे नेते ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी सांगितले.
गोव्यातील २५ टक्के जनता खाण कामावर अवलंबून असून जवळपास एका वर्षांपासून खाण उद्योग बंद आहे. त्याबाबत केंद्र अथवा राज्य सरकार गंभीर नाही, असेही फोन्सेका म्हणाले.