गोव्यातील पंचायत निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. गोव्याच्या १८६ पंचायतींमधील १,४५० वॉर्डांसाठी ही निवडणूक होत आहे. ११ जूनला या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया पार पडली होती. यावेळी मतदार मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडले होते. त्यामुळे ८०.३३ टक्के इतके विक्रमी मतदान झाले होते. यापैकी उत्तर गोव्यातून ८३.१६ टक्के तर दक्षिण गोव्यातून ७७.८६ टक्के इतके मतदान झाले होते. एकूण १,४५० वॉर्डांपैकी ५४० वॉर्ड हे अनूसुचित जाती -जमाती आणि ओबीसी  समाजासाठी तर ४९० वॉर्ड महिलांसाठी आणि ३२३ वॉर्ड साधारण प्रवर्गासाठी राखीव होते. २०१२ साली ८०.१२ टक्के मतदान झाले तर २००७ साली ते ८ टक्क्यांनी कमी झाले होते. यंदा राज्यातील एकूण ७ लाख ४९ हजार ६८६ मतदारांपैकी ६ लाख २ हजार २३१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात ३ लाख १४ हजार ८०४ महिलांचा तर २ लाख ८७,४२७ पुरुष मतदारांचा यामध्ये समावेश आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त आर. के. श्रीवास्तव यांनी दिली. दरम्यान, या निवडणुकीतील ५५ उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत. उत्तर गोव्यातील पंचायतीमधून २८४० तर दक्षिण गोव्यातील पंचायतीतून २४५७ उमेदवार अंतिम रिंगणात आहेत. एकूण १८६ पंचायतीच्या १५२१ प्रभागांसाठी ६३५१उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. या पंचायत निवडणुकीत मतदान यंत्राचा वापर न करता पारंपरिक पद्धतीने मतपत्रिकेद्वारे मतदान झाले होते. उमेदवारांना चिन्हे देण्यात आल्यानंतर मतपत्रिकांची छपाई करण्यात आली होती. गोव्यात काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र, भाजपने मोठ्या हुशारीने लहान पक्षांची मोट बांधून सत्तास्थापन करून काँग्रेसला धोबीपछाड दिला होता. त्यानंतर काही दिवसांच्या अंतरानेच पंचायत निवडणुका झाल्याने आजच्या निकालांना विशेष महत्त्व आहे.

ठळक घडामोडी पुढीलप्रमाणे:

* व्हेल्गुएम-सुरला-अमोना-नवेलिअम-कुडेनिअम पंचायतीमध्ये भाजप आमदार प्रमोद सावंत यांचे पॅनल विजयी
* मार्केम मतदारसंघातील वाडी-तालोलिअम पंचायतीच्या सातपैकी पाच जागांवर मगोप आमदार सुदिन ढवळीवकर पुरस्कृत पॅनलचा विजय
* सत्तारीमध्ये उर्मिला मांजरेकर (ओंडा),  विशांत बाबर (गुलेलीम), अंकिता गवस (ठाणे) तीन माजी सरपंचांचा पराभव
* धरगळ आणि कॅसने-अंबरीम-पोरास्केडम पंचायतीमध्ये आमदार बाबू अझगावकर यांचे पॅनल विजयी
* अगासेम पंचायतीमध्ये काँग्रेस आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांचे पॅनेल ११ जागांवर विजयी
* गुलेली व खोटोडेम पंचायतीमध्ये विश्वजीत राणे पुरस्कृत पॅनल विजयी
* बांदोरा पंचायतीमध्ये मगोपच्या सुदीन ढवळीवकर पुरस्कृत  पॅनल ११ जागांवर विजयी
* बाटीम (सांग्वेम) पंचायतीच्या सातही जागांवर उदय नाईक यांचे पॅनल विजयी
* बेथोरा-निरंकाल-कोडार पंचायतीमध्ये काँग्रेस  आमदार  सुभाष शिरोडकर यांचे पॅनल ११ पैकी ७ जागांवर विजयी
* बल्ली पंचायतीमध्ये सर्व नव्या चेहऱ्यांचा विजय; आमदार बाबू आणि आमदार क्लफाशिओ पुरस्कृत पॅनल विजयी
* असोल्डा पंचायतीमध्ये भाजप आमदार निलेश कब्राल यांचे  पॅनल विजयी
* बाटीम पंचायतीच्या सर्व जागांवर फ्रान्सिस सिल्व्हेरांचे पॅनल विजयी
* चिकालीम पंचायतीमध्ये भाजप नेते मॉविन गॉडिन्होंचे पॅनल विजयी
* राया पंचायतीमध्ये ‘आप’च्या लिंडा वाझ विजयी
* मोईरा पंचायतीमध्ये सदानंद राऊळ, लहू ठाकूर, पुजा चारी, रिया बेल्हेकर, ओसवाल्ड कॉडिरिओ, सुर्यकांत भाटलेकर आणि महेश साटलेकर विजयी
* असगाव पंचायतीमध्ये हनुमंत नाईक, जॉकी क्वॉर्डोस, रिया नाईक, जोसेफ डिसोझा, कार्तिक केरकर, जालिंदर गावकर आणि सागर नाईक विजयी
* साळीगाव पंचायतीमध्ये उदय चंदेलकर, प्रेमानंद कोचरेकर, उल्हास मोराजकर विजयी
* परा पंचायतीमध्ये मायकेल लोबोंच्या पॅनलचा दणदणीत विजय
* कन्सॉलिम पंचायतीमध्ये मार्था सालढाणा पॅनलकडून आप पुरस्कृत पॅनलचा पराभव
* सालसेट तालुक्यात सर्वाधिक ३३ पंचायती
* पोरिएमच्या ठाणे पंचायतीमध्ये काँग्रेस पुरस्कृत पॅनल विजयी; पोरिएम काँग्रेसचे आमदार प्रतापसिंह राणे यांचा मतदारसंघ
* करंबोलीम पंचायतीमध्ये भाजप आमदार पांडुरंग मडकईकर यांचे पॅनल विजयी; नऊपैकी सात जागांवर विजय
* संपूर्ण निकाल संध्याकाळपर्यंत जाहीर होणार; तालुका स्तरावरील १३ केंद्रावर सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात
* मतपत्रिकांमुळे मतमोजणीची प्रक्रिया संथ गतीने सुरू; गेल्या तीन तासांमध्ये केवळ १५ पंचायतींचेच निकाल जाहीर
* १८६ प्रभागांमध्ये मतमोजणी सुरू
* कन्सॉलिम पंचायतीमध्ये मार्था सालढाणा पॅनलचा विजय
* सालीगाव पंचायतीत सरपंचांचा ६ मतांनी पराभव
* भिरोंड्यात विश्वजीत राणेंच्या पॅनलचा दणदणीत विजय