News Flash

अश्लील वर्तनप्रकरणी ‘तहेलका’चे तेजपाल यांची चौकशी होणार

महिला सहकाऱ्याशी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी ‘तहेलका’चे संपादक तरुण तेजपाल वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

| November 22, 2013 01:25 am

महिला सहकाऱ्याशी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी ‘तहेलका’चे संपादक तरुण तेजपाल वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. गोवा पोलिसांनी तेजपाल यांच्या चौकशीचे आदेश दिले असून, या आठवडय़ातच त्यांची चौकशी होणार आहे. दरम्यान, तेजपाल यांनी सहा महिन्यांसाठी संपादकपदावरून दूर राहण्याचा निर्णय घेतला असून, तसा ई-मेल त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना पाठवला आहे.
तहेलकामध्ये काम करणाऱ्या एका महिला पत्रकाराने तेजपाल यांच्यावर विनयभंगाचा आरोप केला आहे. १० दिवसांपूर्वी गोव्यामधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये तेहलकाने आयोजित केलेल्या कार्यक्रमादरम्यान तेजपाल यांनी लिफ्टमध्ये आपला विनयभंग केला, अशी तक्रार या महिलेने तेहलकाच्या व्यवस्थापकीय संपादक शोमा चौधरी यांच्याकडे केली. तेहलका नियतकालिकाची व्यवस्थापकीय समिती या प्रकरणाची चौकशी करून योग्य कारवाई करील, असे आश्वासन चौधरी यांनी या महिला पत्रकाराला दिले होते. मात्र चौधरी यांच्या या विधानामुळे महिला कार्यकर्त्यां आणि वरिष्ठ पत्रकारांनी नाराजी व्यक्त करीत तेजपाल यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी केली.
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या प्रकरणाच्या प्राथमिक चौकशीचे आदेश दिले. या प्रकरणी विनयभंग झालेल्या महिलेने अद्याप तक्रार दाखल केली नसली तरी या गंभीर प्रकरणाची दखल घेत स्वत:हून चौकशी करू शकतात, असे पर्रिकर यांनी सांगितले. ज्या हॉटेलमध्ये हा प्रकार घडला, त्या हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
काँग्रेसची सावध प्रतिक्रिया
तेहलकाचे संपादक तरुण तेजपाल यांच्यावर महिला सहकाऱ्याने केलेल्या अश्लील वर्तनाच्या आरोपाप्रकरणी काँग्रेसने सावध प्रतिक्रिया व्यक्त केली आहे, तर भाजपने तेजपाल यांना अटक करून कारवाईची मागणी केली आहे.
‘‘हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे. या प्रकरणाची तपशीलवार माहिती घेतल्यानंतरच ठोस प्रतिक्रिया देऊ,’’ असे केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री मनीष तिवारी यांनी सांगितले. मंगळवारी वृत्तवाहिन्यांवर या प्रकरणाची बातमी ऐकली. मात्र तरीही पुरेशी माहिती घेतल्याशिवाय आम्ही काहीही बोलणार नाही, असे तिवारी म्हणाले.
भाजपने मात्र या प्रकरणी कोणालाही पाठीशी घालू नये, असे सांगत तेजपाल यांच्या अटकेची मागणी केली. तेजपाल यांनी सहा महिन्यांसाठी संपादकपद सोडले असले, तरी हे पुरेसे नाही. त्यांना तात्काळ अटक करून या प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात करावी, असे भाजपचे प्रवक्ते मीनाक्षी लेखी यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2013 1:25 am

Web Title: goa police may probe molestation charges against tehelkas tarun tejpal as condemnation mounts
टॅग : Tarun Tejpal
Next Stories
1 सोशल मीडियाचा वापर देशात अशांतता पसरविण्यासाठी!
2 विशेष न्यायालयाच्या स्थापनेस आव्हान देण्याचा मुशर्रफ यांचा निर्णय
3 मुझफ्फरनगर दंगलीतील विशिष्ट धर्माच्या पीडितांना भरपाई
Just Now!
X