गोव्यामधील बेनॉलिमच्या समुद्रकिनाऱ्यावर दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री घडली. या घटनेमुळे गोव्यामध्ये खळबळ उडालेली असतानाच गोव्याच्या विधानसभेत याचसंदर्भात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केलेल्या वक्तव्यावरुन नवीन वाद सुरु झालाय. सावंत यांनी केलेल्या वक्तव्यावरुन अनेकांनी नाराजी व्यक्त केली जात असतानाच आता ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी या मुद्द्यावरुन थेट भाजपावर निशाणा साधलाय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
नेमकं घडलं काय?
 

रविवारी अर्थात २५ जुलै रोजी गोव्याच्या बेनॉलिम बीचवर १४ वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींवर सामुहिक बलात्काराची घटना घडली. चार जणांनी या मुलींवर बलात्कार केला. तसेच, त्यांच्यासोबत असणाऱ्या मित्रांना धमकावले. पोलीस असल्याचं सांगून या चौघांनी आधी त्यांच्यावर आरडा-ओरडा केला. त्यानंतर दोघा मुलींवर बलात्कार केला. यापैकी एक जण गोव्याच्या कृषी विभागात ड्रायव्हर म्हणून काम करतो. यानंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईत तिघांना अटक करण्यात यश आल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी विधानसभेत दिली.

मुख्यमंत्री काय म्हणाले?

“जेव्हा १४ वर्षांच्या अल्पवयीन मुली रात्रभर बीचवर राहतात, तेव्हा पालकांनी त्यावर आत्मपरीक्षण करायला हवं. या मुली रात्रभर बाहेर का होत्या?” असा प्रश्न प्रमोद सावंत यांनी विधानसभेत बोलताना उपस्थित केला. मुलांची जबाबदारी ही पालकांची जबाबदारी आहे, अशी देखील भूमिका प्रमोद सावंत यांनी मांडली. “आपल्या मुलांची सुरक्षितता ही पालकांची जबाबदारी आहे. जेव्हा १४ वर्षांची मुलं रात्रभर बीचवर राहतात, तेव्हा पालकांनीच आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. फक्त मुलं ऐकत नाहीत म्हणून आपण त्याची जबाबदारी सरकार आणि पोलिसांवर टाकू शकत नाही,” असं म्हणतानाच पालकांनी आपल्या मुलांना, विशेषत: अल्पवयीन मुलांना रात्री बाहेर पडू देऊ नये, असं देखील प्रमोद सावंत विधानसभेमध्ये म्हणाले. विशेष म्हणजे, प्रमोद सावंत यांच्याकडेच राज्याच्या गृहमंत्रीपदाची सूत्रं आहेत.

प्रशांत भूषण यांची टीका

भाजपा तसेच केंद्रातील मोदी सरकारवर अनेकदा टीका करणाऱ्या प्रशांत भूषण यांनी प्रमोद सावंत यांच्या वक्तव्यासंदर्भातील बातमीचं ट्विट कोट करुन त्यावर प्रतिक्रिया दिलीय. “भाजपा अशा लोकांना मुख्यमंत्री का बनवते?”, असा प्रश्न या बातमीवर प्रतिक्रिया देताना भूषण यांनी उपस्थित केलाय.

 
विरोधकांची आगपाखड
 
खुद्द मुख्यमंत्र्यांनीच अशा प्रकारची भूमिका घेतल्यामुळे विरोधकांनी या मुद्द्यावरून सरकारवर तीव्र शब्दांमध्ये टीका केली आहे. “राज्यातमधील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती चिंताजनक झाली आहे. रात्री बाहेर फिरताना आम्ही भिती का बाळगावी? खरंतर गुन्हेगारांना जेलमध्ये टाकायला हवं आणि कायद्याचं पालन करणाऱ्या नागरिकांना बाहेर मोकळेपणाने फिरता यायला हवं”, अशी भूमिका गोव्याचे काँग्रेस प्रवक्ते अ‍ॅल्टन डिकोस्टा यांनी मांडली आहे. तर, “नागरिकांची सुरक्षा ही पोलीस आणि राज्य सरकारची जबाबदारी आहे. जर ते ही सुरक्षा पुरवू शकत नाहीत, तर मुख्यमंत्र्यांना त्या पदावर राहण्याचा अधिकार नाही”, अशा शब्दांत गोवा फॉरवर्ड पार्टीचे आमदार विजय सरदेसाई यांनी टीका केली आहे.
 
More Stories onगोवाGoa
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Goa rape case why does bjp appoint such people as cm prashant bhushan slams cm pramod sawant scsg
First published on: 29-07-2021 at 16:25 IST