26 January 2021

News Flash

पंतप्रधान मोदींविरोधात ट्विट; ‘गोएअर’ने पायलटला तडकाफडकी कामावरून काढले

पायलट म्हणतो ते माझं वैयक्तिक मत

संग्रहित छायाचित्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी गोएअर या हवाई वाहतूक करणाऱ्या कंपनीनं तात्काळ पायलटला कामावरून काढून टाकले. पंतप्रधानांविषयी अवमानकारक विधान केल्याप्रकरणी पायलटला तात्काळ कामावरून निलंबित केलं असल्याचं कंपनीच्या प्रवक्त्यांनी म्हटलं आहे.

मिकी मलिक असं गोएअरने कामावरून काढून टाकलेल्या पायलटचे नाव आहे. मिकी मलिक यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर ट्विट करून टीका केली होती. मलिकच्या ट्विटवर आक्षेप घेत कंपनीने ही कारवाई केली. “पंतप्रधान मुर्ख आहेत. तुम्ही मलाही मुर्ख म्हणू शकता. मला वाईट वाटणार नाही. कारण की, मी पंतप्रधान नाही. पण पंतप्रधान मुर्ख आहेत,” असं अशी टीका मलिक यांनी ट्विटमधून केली होती.

मलिक यांच्या ट्विटवर आक्षेप घेत अनेकांनी संताप व्यक्त केला. वाद निर्माण झाल्यानं मलिक यांनी ते ट्विट उडवलं. त्याचबरोबर माफीही मागितली. तसेच ट्विटर अकाऊंट लॉकही केलं.

“पंतप्रधानांबद्दल आणि इतर काही आक्षेपार्ह ट्विटबद्दल मी माफी मागतो. कुणाच्या भावना दुखावल्या असतील, तर दिलगीरी व्यक्त करतो. ट्विटमधून व्यक्त करण्यात आलेली मते वैयक्तिक होती. त्यांच्याशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या गोएअरचा कोणताही संबंध नाही,” असं सांगत मलिक यांनी माफीही मागितली आहे.

दरम्यान, या प्रकरणी गोएअरने मलिक यांना तडकाफडकी कामावरून कमी केलं आहे. “गोएअरची अशा प्रकरणात झिरो टॉलरन्स पॉलिसी आहे आणि ती कंपनीशी संबंधित असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना बंधनकारण आहे. गोएअरच्या सर्व कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या नियमांचं, कायद्यांचं आणि सोशल मीडिया संबंधित धोरणांचं पालन करणे बंधनकारक आहे,” असं गोएअरच्या प्रवक्त्यांनी या कारवाईबद्दल बोलताना सांगितलं.

गोएअरने केलेली ही पहिलीच कारवाई नाही. यापूर्वी जून २०२०मध्येही कंपनीने एका प्रशिक्षणार्थी पायलटची हकालपट्टी केली होती. या पायलटने सीता आणि हिंदू धर्माविषयी वादग्रस्त ट्विट केल्याचा ठपका ठेवत कंपनीने ही कारवाई केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2021 10:02 am

Web Title: goair fires senior pilot for tweeting against pm modi bmh 90
Next Stories
1 इंडोनेशियात विमान समुद्रात कोसळले, ६२ जणांना जलसमाधी
2 लसीकरण १६ तारखेपासून
3 ‘कोव्हॅक्सिन’च्या चाचणीत सहभागी स्वयंसेवकाचा मृत्यू
Just Now!
X