भारतामध्ये क्रिकेट हा धर्म समजला जातो आणि क्रिकेटपटू म्हणजे देव. पण या देवांचे पायही मातीचेच आहेत आणि त्यांच्या खेळाप्रतीच्या बांधीलकीबाबत अनेक शंका आहेत.. असे मर्मभेदी मत व्यक्त केले आहे इंग्लंडचा माजी कर्णधार नासीर हुसेन यांनी.
कोलकात्यातील पराभवानंतर भारतीय संघातील देवासमान वाटणाऱ्या दिग्गज खेळाडूंच्या बांधीलकीवरआता मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे, अशी टीका करतानाच, भारताचे प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांनी धोनी, गंभीर, वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर यांच्या डोळ्यांत त्यांच्यामध्ये खेळाबद्दलची किती भूक आहे ती पाहावी, असा सल्ला हुसेन यांनी ‘डेली मेल’ या वृत्तपत्रामधील आपल्या स्तंभाद्वारे दिला आहे. भारताने अखेरच्या कसोटी सामन्यासाठी झहीर खान, युवराज सिंग आणि हरभजन सिंग यांना डच्चू दिला आहे, पण भारतीय खेळाडूंमध्ये सध्याची जी वृत्ती आहे ती बदलायला हवी, असेही त्यांनी म्हटले आहे.‘‘कर्णधार महेंद्रसिंग धोनी, गौतम गंभीर आणि संघातील काही वरिष्ठ खेळाडू कोलकात्यातील पराभवानंतर हॉटेलमध्ये गेले तेव्हा त्यांना हा पराभव किती बोचला? खेळाबद्दलची किती भूक त्यांच्यामध्ये आहे. करोडपती झालेल्या खेळाडूंची खेळाबद्दलची मानसिक आणि शारीरिक भूक अजूनही कायम आहे का? या परिस्थितीचा हे खेळाडू खोलवर विचार करतील का?’’, असे विविध बोचरे प्रश्नही त्यांनी विचारले आहेत .    
.. आणि हा घरचा अहेर!
सचिनने क्रिकेटमधील अनेक विक्रम पादाक्रांत केले आहेत. पण आता त्याला धावांसाठी झगडायला लागते आहे. सचिनची कामगिरी चांगली होत नाही, हे कुणीही सांगू शकेल. मी सचिनच्या जागी असतो, तर सरळ बाहेर पडलो असतो, पण सध्याच्या परिस्थितीत हे सारे सचिनवरच अवलंबून आहे.’’
सौरव गांगुली, भारताचा माजी कर्णधार
लोक प्रवृत्तीप्रमाणेच बोलतात की खेळाडूंना कसलीच चिंता नसते, ते फक्त इंडियन प्रीमियर लीगमध्ये मिळणाऱ्या पैशामागेच धावतात. ही फक्त नाण्याची एक बाजू आहे. पण मुख्य म्हणजे खेळाडूंमध्ये कौशल्य आणि क्षमतेचाच अभाव जाणवतो आहे आणि हे अधिक चिंताजनक आहे. त्यामुळेच खेळाडूंची गुणवत्ता आणि दर्जा यांच्याबाबत शंका उपस्थित होणे स्वाभाविक आहे.
राहुल द्रविड, भारताचा माजी कर्णधार