भारताचा मास्टर ब्लास्टर फलंदाज सचिन तेंडुलकरचे रविवारी आंध्रप्रदेशाच्या नेल्लोर जिल्ह्यातील पुत्तमराजूकन्ड्रिगा गावामध्ये मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. माजी क्रिकेटर आणि राज्यसभा खासदार सचिन तेंडुलकरने ‘खासदार आदर्श ग्राम योजने’तंर्गत हे गाव विकास करण्यासाठी दत्तक घेतले आहे. ११० कुटुंबे राहत असलेल्या या गावात अद्याप रस्त्याची आणि शौचालयाची सुविधा नाही. या गावात एकमेव शाळा असून तिथे फक्त पाचवीपर्यंतच्या शिक्षणाची सोय आहे. पुत्तमराजूकन्ड्रिगा गावाची लोकसंख्या पाच हजार असून तो तिरुपती लोकसभा क्षेत्रात येतो. इथला मुख्य व्यवयाय शेती आणि दूध उत्पादन आहे. आज सकाळी नऊच्या सुमारास सचिन तेंडुलकर जेव्हा गावात आला तेव्हा रंगीबेरंगी कपडे घातलेल्या गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात त्याचे स्वागत केले. यावेळी सचिनने येथील गावकऱ्यांशी संवाद साधला असता, लोकांनी गावातील समस्यांविषयी सचिनला माहिती दिली. सचिन तेंडुलकरने पुत्तमराजूकन्ड्रिगा गावाच्या विकासासाठी त्याच्या ‘खासदार स्थानिक क्षेत्र विकास योजने’तून तीन कोटी रुपये निर्धारित केले आहेत.