हिग्ज बोसॉन उर्फ देवकणाला नोबेल मिळावे, अशी वैज्ञानिक जगताची मनोमन इच्छा होती; त्याच्या सैद्धांतिक रूपाला का होईना नोबेलने सन्मानित करण्यात आले ही समाधानाची बाब आहे. फ्रँकाइस एंगलर्ट व पीटर हिग्ज यांना हा सन्मान मिळाला आहे. द्रव्याला वस्तुमान प्राप्त करून देणारा एक अदृश्य कण आहे; तोच हा हिग्ज बोसॉन म्हणजे देवकण. देव दिसत नाही पण त्याचे अस्तित्व जाणवते असे आपण मानतो, तसा हा कण दिसत नाही पण त्याचे परिणाम दिसतात; म्हणून कदाचित त्याला ‘देव कण’ नाव दिले असावे. स्वत: हिग्ज यांना त्याला देवकण म्हटलेले आवडत नाही. १९६४ मध्ये असा अदृश्य कण असल्याचा सिद्धांत ब्रिटनचे पीटर हिग्ज, बेल्जियमचे फ्रँकॉइस एंगलर्ट व रॉबर्ट ब्राऊट यांनी मांडला होता. आता त्यातले ब्राउट हयात नाहीत. त्यानंतर २०१२ मध्ये या हिग्ज बोसॉन कणाचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला व हा मूलभूत सिद्धांत बरोबर ठरला. स्वित्र्झलडमधील जीनिव्हाच्या सीमेवर सर्न प्रयोगशाळेत प्रोटॉन शलाका एकमेकावर आदळवून विश्वनिर्मितीवेळी होती तशी स्थिती निर्माण करून या हिग्ज बोसॉनचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला. नवीन सापडलेला कण हा हिग्ज बोसॉनच आहे हे अजून कुणीच ठामपणे सांगू शकत नाही, तो नवीनच कण आहे त्यामुळे हिग्ज बोसॉन कणाचे अस्तित्व वर्तवणाऱ्या व प्रमाणित प्रारूपाला पाठबळ देणाऱ्या या सैद्धांतिक संशोधनाला नोबेल देण्यात आले.  प्रमाणित प्रारूप हे एका मूलकणावर आधारित आहे, तो म्हणजे हिग्ज बोसॉन कण. यातील बोसॉन हे नाव सत्येंद्रनाथ बोस यांनी त्यात दिलेल्या योगदानामुळे आहे. हा कण अदृश्य क्षेत्राशी निगडित असतो, जे क्षेत्र अवकाश भरून टाकत असते. जेव्हा आपले विश्व रिकामे होते तेव्हाही हे क्षेत्र होते. ते नसते तर इलेक्ट्रॉन, क्वार्क या कणांना प्रकाशकणांप्रमाणे वस्तुमानरहित अवस्था मिळाली असती व ते आईनस्टाइनच्या सिद्धांताप्रमाणे प्रकाशकणांच्या वेगाने अवकाशातून गेले असते व ते अणूरेणूत सामावलेच गेले नसते. १९६४ मध्ये एंगलर्ट व हिग्ज यांनी या मूलकणाचे अस्तित्व सिद्धांताने मांडले. ते स्वतंत्रपणे काम करीत होते, त्यांच्या संशोधनामुळे प्रमाणित प्रारूपाला आधार मिळाला. नंतर  किमान ५० वर्षे या मूलकणाचा शोध चालू होता. बुधवार ४ जुलै २०१२ रोजी युरोपच्या कणभौतिकी प्रयोगशाळेत म्हणजे जीनिव्हातील सर्न येथे हिग्ज कण सापडल्याची पुष्टी करण्यात आली तेव्हा त्यांचा सिद्धांत प्रायोगिक पातळीवर खरा ठरल्याचे दिसून आले.कोडय़ातून कोडे
प्रत्यक्षात एखादा मूलकण शोधणे सोपे नाही. प्रत्येक वेळी जो कण सापडतो तो नवीनच असतो, वस्तुमानरहित कण एकमेकांवर आदळतात तेव्हा नवीन कण तयार होतो. जेव्हा दोन फोटॉन आदळतात तेव्हा ते इलेक्ट्रॉन व त्याचा प्रतिकण पॉझिट्रॉन तयार करतात. दोन ग्लुऑन कणांच्या टकरीतून हिग्ज कण तयार होतो फक्त त्यांची ऊर्जा पुरेशी हवी. प्रोटॉन हे क्वार्क, अँटीक्वार्क व ग्लुऑन यांनी भरलेली पिशवी असते. त्यांच्यातील बहुतेक कण एकमेकांवर आदळतात तेव्हा प्रत्यक्षात अनेक टकरी  होत असतात. अशा टकरीतून जे छोटे स्फोट होतात त्यातून पुन्हा आणखी हजारो कणांचे आघात होतात. १२५ गिगॅइलेक्ट्रॉन व्होल्टला हिग्जचा कण प्रोटॉनपेक्षा जड बनतो व त्यामुळेच तो निर्माण करणे कठीण असते. प्रमाणित प्रारूप हा काही वैश्विक कोडय़ाचा अंतिम भाग नाही. या प्रारूपानुसार ‘न्यूट्रिनो’ हे वस्तुमानरहित कण आहेत. आताच्या संशोधनानुसार त्यांना वस्तुमान असते. प्रमाणित प्रारूपाचे कोडे हिग्ज कणाने सोडवले असे म्हटले तरी कोडय़ातून कोडी निर्माण होत आहेत.    
(संदर्भ -नोबेल संकेतस्थळ)