बुधवार, १६ सप्टेंबर २०१५. सकाळी ९ वाजता आंध्र प्रदेशातली विजयवाडा जिल्ह्य़ातील इब्राहिमपट्टणम या छोटय़ा खेडय़ात गोदावरी आणि कृष्णेचा संगम झाला. गोदावरीचे पाणी कृष्णेमध्ये सोडण्यात आले आणि महत्त्वाकांक्षी नदीजोड योजनेतील पहिला-वहिला प्रकल्प वास्तवात उतरला. १९५०मध्ये तत्कालीन केंद्रीय पाटबंधारेमंत्री व प्रतिथयश अभियंते के. एल. राव यांनी नद्याजोड प्रकल्पाचे स्वप्न पाहिले होते. पुढे अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना या प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला. त्याचा प्रारंभ केला तो आंध्रातील तेलुगू देशमच्या सरकारने. याचा फायदा आंध्रातील रायलसीमा भागातील कायम दुष्काळाच्या छायेत असणाऱ्या जिल्ह्य़ांना होणार आहे. तसेच गोदावरीतील पाण्याचा वापर केल्याने कृष्णा खोऱ्यातील लोकांच्या मागणीनुसार नागार्जुन सागर प्रकल्पातून सोडावे लागणारे पाणी वाचणार आहे. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या सरकारने विक्रमी आठ महिन्यांत हा प्रकल्प पूर्ण करून दाखवला हे विशेष.

 

असा आहे प्रकल्प..

’पोलवरम उजव्या कालव्याद्वारे पट्टीसीमा उपसा जलसिंचन योजनेद्वारे गोदावरीचे पाणी कृष्णेत सोडणार. योजनेचा खर्च १३०० कोटी रुपये.
’सर्वसाधारणपणे ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबर या तीन महिन्यांत गोदावरीला पूर असतो. ते पाणी कृष्णा नदीत वळवणार.गोदावरीतील ८० टीमसी पाणी खेचण्यात येणार.
’१७४ किमी अंतरावरून ५३०० अश्वशक्तीच्या २४ पंपांद्वारे पाणी खेचणार. गोदावरीची पातळी १४ फुटांपर्यंत जाईल तेव्हा हे पंप आपोआप कार्यरत होतील अशी रचना. मार्च २०१६ अखेर सर्व पंप कार्यरत होतील अशी अपेक्षा.

प्रकल्पाचा फायदा

’कृष्णा व गुंटुर जिल्ह्य़ातील १२ लाख एकर शेतीला फायदा.
’१० टीएमसी पाणी कृष्णा व पश्चिम गोदावरी जिल्ह्य़ात घरगुती व औद्योगिक वापरासाठी .
’विजयवाडा व आंध्रची नियोजित नवी राजधानी अमरावतीच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत.

’नदीजोड प्रकल्पाचा आराखडा दहा वर्षांपूर्वी अस्तित्वात आला.