स्वत:च्या आडनावासाठी लढणारे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांना लोकसभा सचिवालयाने दिलासा दिला आहे. असंसदीय यादीतून ‘गोडसे’ शब्द वगळण्याचे आदेश लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी दिले आहेत. मात्र ‘नथ्थूराम गोडसे’ हे नाव असंसदीय शब्दांच्या यादीत कायम राहणार आहे. यापुढे संसदीय कामकाजात ‘नथ्थूराम गोडसे’ शब्द वगळण्यात येईल.
गतवर्षी हिवाळी अधिवेशनात ‘गोडसे’ शब्द असंसदीय ठरवण्यात आला होता. त्यास खा. गोडसे यांनी आक्षेप घेतला होता. ‘माझे आडनाव असंसदीय कसे’, असा प्रश्न उपस्थित करून हा प्रकार अत्यंत वेदनादायी असल्याची व्यथा खा. गोडसे यांनी लोकसभा सचिवालयास पत्राद्वारे कळवली होती. त्याची तातडीने दखल घेत सचिवालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘गोडसे शब्द सरसकट असंसदीय ठरवता येणार नाही’, असा शेरा मारला होता.
माझेच नव्हे तर महाराष्ट्रात अनेकांचे आडनाव गोडसे आहे. ते बदलता येणार नाही, असे खा. गोडसे यांनी  सुमित्रा महाजन यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते. या पत्रावर सचिवालयातील प्रमुख अधिकाऱ्यांनी शेरा मारला आहे.   ‘महात्मा गांधींच्या मारेकऱ्याचे नाव नथूराम गोडसे होते; म्हणून ‘गोडसे’ शब्द असंसदीय ठरवता येणार नाही,’ असे अधिकाऱ्यांनी पत्रावर म्हटले होते. त्यावरून सुमित्रा महाजन यांनी ‘गोडसे’ शब्द असंसदीय यादीतून वगळण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात ‘गोडसे’ शब्द संसदीय तर ‘नथ्थूराम गोडसे’ असंसदीय ठरेल. दि. १६ एप्रिल रोजी यासंबंधीचे आदेश महाजन यांनी दिले आहेत. नथूराम गोडसेमुळेच हा शब्द असंसदीय ठरला होता. त्याशिवाय या शब्दाविषयी कोणताही आक्षेप नाही.
गतवर्षी हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी ‘गोडसे’ शब्द असंसदीय असल्याचे स्पष्ट झाले होते. माकपच्या पी. राजीव यांनी चर्चेदरम्यान ‘गोडसे’ हा शब्द वापरला होता. मात्र तो कामकाजातून वगळण्यात आला होता. राजीव यांनी स्पष्टीकरण मागितल्यावर राज्यसभेचे उपसभापती पी. जे. कुरियन यांनी ‘गोडसे’ शब्द असंसदीय असल्याचे सांगितले होते. गोडसे या शब्दाव्यतिरिक्त हिटलर, मुसोलिनी, रावण हे शब्दही असंसदीय ठरवण्यात आले होते. विशेष म्हणजे १९५८ साली ‘कम्युनिस्ट’ हा शब्द असंसदीय ठरवण्यात आला होता, तर २००३ साली सोनिया गांधी यांना एका भाजप खासदाराने ‘विदेशी’ संबोधल्याने हा शब्दही असंसदीय यादीत टाकण्यात आला होता. त्यानंतर वेळोवेळी हे शब्द असंसदीय यादीतून वगळण्यात आले आहेत.