पत्रकारितेतील उल्लेखनीय कामगिरीसाठी दिले जाणारे ‘रामनाथ गोएंका उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार’ राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रदान केले जात आहेत. हा सोहळा नुकताच सुरु झाला आहे.

सरकार आणि नक्षलवाद्यांच्या संघर्षांत भरडल्या जाणाऱ्या बस्तरच्या अंतर्भागातील जंगलांपासून, तर अल्पवयीनांवरील लैंगिक अत्याचारांपर्यंत आणि या वर्षीच्या सर्वात मोठय़ा भांडाफोडीपासून ते दावे आणि आकडेवारी यांमधली तफावत उघडकीस आणणाऱ्या तपासापर्यंतच्या बातम्यांचा समावेश ‘रामनाथ गोएंका उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारा’त आहे.

पत्रकारितेत २०१८मध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या पत्रकारांना ‘रामनाथ गोएंका उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित केले जाते आहे.  सध्या वृत्तविश्वाचं ध्रुवीकरण झाले असताना आणि वस्तुस्थिती व खोटेपणा यात भेद करणे कठीण असताना, रामनाथ गोएंका पत्रकारिता पुरस्कार निष्पक्षता, नेमकेपणा, विश्वासार्हता आणि सत्य सांगणाऱ्या निर्भयतेचे प्रतीक ठरले आहेत. हे पुरस्कार २००६ साली सुरू करण्यात आले. धोकादायक किंवा कठीण परिस्थितीत अचूक बातम्या देण्याचे कर्तव्य बजावलेल्या  मुद्रित, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यमांतील पत्रकारांना ‘रामनाथ गोएंका उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारा’ने गौरवण्यात येते. ‘रामनाथ गोएंका मेमोरियल फाऊंडेशन’तर्फे हे पुरस्कार देण्यात येतात.

पुरस्कारांचे स्वरूप, व्याप्ती

यंदा या पुरस्कारांसाठी मुद्रित, डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांतील व्यापार व अर्थशास्त्र, राजकीय वार्ताकन, नागरी पत्रकारिता, पर्यावरण, विज्ञान आणि तंत्रज्ञान, संघर्षक्षेत्रातील पत्रकारिता आणि प्रादेशिक भाषांतील वार्ताकन यांसारख्या महत्त्वाच्या विषयांची वर्गवारी करण्यात आली आहे. प्रत्येक श्रेणीतील पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये असे आहे.

परीक्षक मंडळ

‘जिंदाल स्कूल ऑफ जर्नालिझम अँड कम्युनिकेशन’चे प्राध्यापक- अधिष्ठाता टॉम गोल्डस्टेन, माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी, पत्रकार आणि इंडियन कौन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्चमधील वरिष्ठ फेलो पामेला फिलिपोज आणि सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती न्या. बी. एन. श्रीकृष्ण यांचा समावेश असलेल्या परीक्षक मंडळाने  यंदाच्या विजेते निवडले आहेत.