माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी न्यायाधीश म्हणून केलेल्या वर्तनाची चौकशी करण्यासाठी तीन न्यायाधीशांची समिती नेमण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. गोगोई हे सध्या राज्यसभेचे खासदार आहेत.

न्या. अरुण मिश्रा यांनी सांगितले की, ही लोकहिताची याचिका असून  निवृत्त सरन्यायाधीश गोगोई पद सोडून दोन वर्षे उलटून गेली असल्याने त्यावर विचार करता येणार नाही.

न्या. बी.आर गवई व न्या. कृष्णा मुरारी यांचा समावेश असलेल्या न्यायपीठाने म्हटले आहे की,  गेली दोन वर्षे तुम्ही या याचिकेचा आग्रह का धरला नाही. आता या याचिकेला काही अर्थ उरला नाही. आम्ही या याचिकेवर विचार करणार नाही. याचिकाकर्ते अरुण रामचंद्र हुबळीकर यांनी याचिकेत म्हटले होते की, गोगोई यांनी सरन्यायाधीश असताना केलेल्या कृतींची चौकशी करण्यात यावी. आम्ही ही याचिका पटलावर घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या महासचिवांशी संपर्क साधला होता पण तरी ती सुनावणीस ठेवली गेली नाही. न्या. गोगोई हे ईशान्येकडील पहिले सरन्यायाधीश होते. ते गेल्या वर्षी १७ नोव्हेंबरला निवृत्त झाले होते.