सोन्याच्या दराने बुधवारी 35 हजारांचा उच्चांकी आकडा पार केला आहे. तसेच तब्बल 20 वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या दरात विक्रमी वाढ झाल्याचेही पहायला मिळाले. मंगळवारी एमसीएक्सवर सोन्याचा दर 403 रूपयांच्या तेजीसह 34 हजार 844 रूपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला. तर घरगुती बाजारपेठेतही सोन्याच्या दरात 200 रूपयांची वाढ झाली असून तो 34 हजार 470 रूपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. तर बुधवारी हे दर 35 हजार 70 रूपयांच्या जवळ पोहोचल्याचे पहायला मिळाले. पुढील काळात ही दरवाढ कायम राहणार असल्याचे मत काही जाणकारांनी व्यक्त केले आहे.

येत्या काही महिन्यांमध्ये सोन्याचे दर 37 ते 38 हजार रूपयांपर्यंत जाणार असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. जून महिन्यात आतापर्यंत सोन्याच्या दरात 10 टक्क्यांची वाढ झाली आहे. तसेच ही दरवाढ कायम राहणार असल्याचेही म्हटले जात आहे. अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे. दरम्यान, सोन्याच्या वाढत्या मागणीमुळेही सोन्याच्या दरात वाढ होत असल्याचे स्थानिक सोने व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय स्तरावरही सोन्याच्या किंमतीत वाढ पहायला मिळाली. न्यूयॉर्कमध्ये सोने 1,429.80 डॉलर्स प्रति औंस आणि चांदी 15.52 डॉलर्स प्रति औंस झाल्याचे पहायला मिळाले. दरम्यान, अमेरिकेतील बँकांनी सोन्यावरील व्याजदरात केलेली कपात आणि त्यामुळे गुंतवणुकदारांनी सुरू केलेली सोन्याची खरेदी याचाही परिणाम आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे दर वाढण्यावर झाला आहे. तसेच डॉलरचे झालेले अवमूल्यन, अमेरिका इराणमध्ये असलेली तणावाची पार्श्वभूमी अशा अनेक कारणांमुळे सोन्याचे दर वाढले असल्याचे म्हटले जात आहे. तसेच घरगुती बाजारपेठेत येत्या वर्षाअखेरिस सोन्याचा दर 38 हजारांवर जाऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.