सोने तसेच चांदीच्या दराने गेल्या काही सलगच्या दरवाढीने विक्रमी टप्पा गाठला होता. तोळ्याला ५६ हजार रुपयांपुढे वाटचाल करणारे सोने तसेच चांदी किलोसाठी ७८ हजार रुपयांपर्यंत पोहोचली होती. सोने १० ग्रॅमसाठी ५० हजार रुपयांवर गेल्यापासून गुंतवणूकदार, खरेदीदारांचाही मौल्यवान धातूकडील ओघ आपसूकच वाढू लागला. गेल्या महिन्याभरात सोने दर थेट ४० टक्क्यांनी वाढले. मागील दोन वर्षांमध्ये तर ही दरवाढ ७५ टक्के इतकी आहे. केवळ सन २०२० मध्येच आंतरराष्ट्रीय बाजारामध्येही सोन्याचे दर ३० टक्क्यांनी वाढले आहेत. करोनाच्या कालावधीमध्ये सुरक्षित गुंतवणूकीचा पर्याय आणि अर्थव्यवस्थेसंदर्भातील संभ्रम कायम असल्याने सोने खरेदीला प्राधान्य देण्यात आल्याने ही दरवाढ दिसून आल्याचे तज्ज्ञ सांगतात. भविष्यात सोन्याचे दर आणखीन वाढण्याची शक्यताही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

नक्की पाहा >> या दहा देशांकडे आहे सर्वाधिक सोनं, पहिल्या स्थानावर आहे…

ऑक्टोबर २०१८ पासून या पिवळ्या धातूचे दर सातत्याने वाढताना दिसत आहेत. त्यातच अमेरिका आणि चीनमध्ये सुरु असणाऱ्या संघर्षामुळेही सोन्याचे दर वाढल्याचे सांगण्यात येते. जगातील दोन मोठ्या अर्थव्यवस्था असणाऱ्या या दोन देशांमध्ये या वर्षातही अनेकदा वैचारिक आणि आर्थिक संघर्ष पहायला मिळाला आहे. त्यामुळेच करोनामुळे आलेली आर्थिक मंदी आणि संकट लवकर सरेल असं चित्र सध्या तरी दिसत नाहीय. सध्या सोन्याचे भाव पडले असले तरी सोन्याचे दर नवीन उच्चांक गाठतील असा अंदाज आयसीआयसीआय डायरेक्टच्या अहवालामध्ये व्यक्त करण्यात आला आहे. दिर्घकालीन विचार केल्यास सोन्याचा दर प्रती १० ग्रामसाठी थेट ७० हजार रुपयांपर्यंत जाऊ शकतो असं या अहवालामध्ये नमूद करण्यात आलं आहे. मागील अनेक वर्षांपासून सुरु असणाऱ्या या दरवाढीचा गुंतवणूकदारांनी फायदा घ्यावा असा सल्लाही या अहवालामध्ये देण्यात आला आहे.

मागील पाच दशकांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरही सोन्याच्या किंमतीमध्ये वाढ होताना दिसल्याचे अहवालामध्ये म्हटलं आहे. मागील तीन ते चार वर्षांमध्ये सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले असून भविष्यातही ते वाढणार असल्याचा अंदाज या अहवालामध्ये व्यक्त केरण्यात आला आहे. पुढील काही वर्षे सोन्याच्या दरांमध्ये वाढच होणार असल्याचे अहवालात म्हटलं आहे. “सध्याच्या करोनाच्या कालावधीमध्ये अनिश्चितता वाढलेली आहे. त्याचबरोबर जागतिक वाढ आणि मानवी जीवनासंदर्भातील चिंताही वाढली आहे. रोखे आणि सोन्यासारख्या संपत्तीचा मोठा साठा असलेल्या अमेरिकेसारखा देश या परिस्थितीचा नक्कीच काहीतरी वेगळ्या दृष्टीने विचार करत असणारा. असं असलं तरी मागील काही काळामध्ये सोन्याच्या दरामध्ये झालेली वाढ ही आश्चर्यचकित करणारी आहे,” असं आयसीआयसीआय डायरेक्टच्या अहवालामध्ये म्हटलं आहे.

जागतिक शेअर बाजार, वस्तू आणि चलन बाजारामध्ये करोनाच्या कालावधी असलेली अस्थिरता पाहता सध्या सोने बाजाराला चांगली मागणी आहे. अनेक देशांमधील केंद्रीय बँकांनी अर्थव्यवस्था सावरण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या आहेत. व्याजदर कमी करण्याचा निर्णयही अनेक बँकांनी घेतला आहे. जागतिक स्तरावरील केंद्रीय बँकर्सचा सोने खरेदीमधील रस वाढल्याने भविष्यातही सोन्याच्या दरांमध्ये वाढ होऊ शकते.

एकूण गुंतवणूकीच्या ५ ते १५ टक्के गुंतवणूक सोन्यामध्ये केल्यास फायदा होऊ शकतो असा सल्ला या अहवालामध्ये भारतीय गुंतवणूकदारांना देण्यात आला आहे.