उत्सव काळात सोन्याच्या दागिन्यांना मोठी मागणी असते. मात्र यंदाचे वर्ष त्याला अपवाद ठरले. नवरात्र आणि दसरा काळात मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी केली जाते. मात्र ५० हजारांपेक्षा अधिकच्या खरेदीवर द्यावा लागणारा तपशील, तस्करीत झालेली वाढ यामुळे सोन्याची झळाळी उतरली आहे. यंदा सोने खरेदीचे प्रमाण निम्म्याने घटले आहे. दसऱ्यादिवशी मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करणाऱ्या अनेकांनी यंदा सोन्याऐवजी इतर वस्तूंना पसंती दिली. दिवाळीच्या दिवसांमध्येही सोने खरेदीला ‘अच्छे दिन’ येणार नाहीत, असा अंदाज सराफ व्यापाऱ्यांकडून व्यक्त केला जातो आहे.

नवरात्र आणि दसऱ्यापासून सोने खरेदीचे प्रमाण वाढल्याचे चित्र दरवर्षी पाहायला मिळते. मात्र यंदा अनेकांनी सोने खरेदीकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे सोने खरेदीत ५० टक्क्यांची घट झाली आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तूंची विक्री मात्र मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मागील वर्षातील नवरात्र आणि दसऱ्याचा विचार करता, यंदा टीव्ही आणि फ्रिजसारख्या वस्तूंच्या विक्रीत १५ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. दिवाळीच्या दिवसांमध्येही हाच ‘ट्रेंड’ कायम राहण्याची शक्यता आहे.

‘नवरात्र आणि दसऱ्याच्या काळात सोने खरेदी वाढते. मात्र यंदा त्यामध्ये घट झाली. सोन्याच्या तस्करीत वाढ झाल्याने सोने ३ ते ४ डॉलर स्वस्त दराने उपलब्ध होत आहे. गेल्या वर्षी या सोन्यासाठी अधिक रक्कम मोजावी लागत होती. याशिवाय सोन्यावर १० टक्के आयात शुल्क आणि ३ टक्के जीएसटी लावण्यात आला आहे. याच कारणामुळे सोन्याची तस्करी वाढली आहे,’ अशी माहिती सराफ व्यापाऱ्यांनी दिली. ‘नवरात्र आणि दसऱ्याच्या काळात सोने खरेदी वाढेल, अशी आशी होती. मात्र सोने खरेदीत ५० टक्के घट झाली. सध्याची एकंदर परिस्थिती उत्सव काळात सोन्याला फार मागणी असेल, असे वाटत नाही,’ असे ऑल इंडिया जेम्स अॅण्ड ज्वेलरी ट्रेड फेडरेशनचे अध्यक्ष नितीन खंडेलवाल यांनी म्हटले.

सोन्याचे दर वाढल्यावर खरेदीमध्ये वाढ होते, असा अनुभव आहे, अशी माहिती सराफा व्यापाऱ्यांनी दिली. उत्तर कोरिया आणि अमेरिकेतील तणाव वाढल्यावर सोन्याचे दर १० टक्क्यांनी वाढले होते. ‘सद्याची स्थिती पाहता सोने खरेदी वाढायला हवी होती. मात्र मनी लॉन्ड्रिंग रोखण्यासाठी सरकारने घेतलेले निर्णय आणि जीएसटीचा फटका सोने खरेदीला बसला आहे,’ असे खंडेलवाल यांनी सांगितले.