नोव्हेंबर २,०१३ ते ऑक्टोबर २,०१४ या वर्षभराच्या कालावधीत मुंबई विमानतळावर सोन्याच्या तस्करीची १,१०२ प्रकरणे आढळल्याची माहिती संसदेत मंगळवारी देण्यात आली. हे सोने प्रामुख्याने संयुक्त अरब अमिरात, सिंगापूर, थायलंड, श्रीलंका, तैवान व इराण येथून प्रामुख्याने बेकायदेशीररीत्या आणण्यात आले होते, असे अर्थ विभागाचे राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी राज्यसभेत सांगितले. २५४.६३ कोटी रुपयांचे अंदाजे ९८५.५ किलो वजनी सोने या कालावधीत जप्त करून ३०२ इसमांना अटक करण्यात आल्याचे सिन्हा म्हणाले. या तस्करीत  विमान कंपन्यांचे पाच व विमानतळावरील सात कर्मचारी गुंतले होते. त्यांनाही अटक करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.