केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) कार्यकारी स्वायत्तता देण्यासाठी माझ्या नेतृत्त्वाखाली नेमण्यात आलेला मंत्रिगट आवश्यक शिफारशी नक्की करेल. मात्र, त्याचवेळी सीबीआयचे उत्तरदायित्वही तितकेच महत्त्वाचे असल्याची स्पष्टोक्ती केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी शुक्रवारी दिली.
सीबीआयच्या स्वायत्ततेसाठी विधेयकाचा मसुदा तयार करण्यासाठी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी उच्चस्तरिय मंत्रिगटाची स्थापना केली. चिदंबरम हेच या मंत्रिगटाचे अध्यक्ष आहेत. मंत्रिगटाची स्थापना झाल्यानंतर पहिल्यांदाच चिदंबरम यांनी त्याबद्दल भाष्य केले.
सीबीआयला कार्यकारी स्वायत्तता देण्यासाठी आम्ही काम करू. त्याचबरोबर सीबीआयच्या तपासामध्ये कोणीही हस्तक्षेप करणार नाही, याचीही आम्ही काळजी घेऊ, असे चिदंबरम म्हणाले.
ब्रिटनच्या दौऱयावर असलेल्या चिदंबरम यांनी तेथील अर्थमंत्री जॉर्ज ओसबोर्न यांच्यासोबत पूर्व लंडन येथील क्रॉसरेल्वे प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
ते म्हणाले, ” संपूर्ण जगामध्ये सर्व संस्था कोणाला ना कोणाला तरी जबाबदार आहेत. एकतर कार्य़कारी मंडळाला किंवा कायदे मंडळाला किंवा न्याय मंडळाला सर्व संस्था जबाबदार असतात.
मला असे वाटते की सीबीआयच्या तपासकार्यात कोणीही हस्तक्षेप करणार नाही, याची खबरदारी घेतली पाहिजे. माझ्या नेतृत्त्वाखाली मंत्रिगट हे काम नक्कीच करेल, असा मला विश्वास आहे.