अभिनेता लुका फ्रेंझी याच्या बहिणीचा इटलीत करोनामुळे मृत्यू झाला. मात्र मृत्यूनंतर तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी कोणीच मदत करत नसल्याचं तो म्हणतोय. लुकाने एक व्हिडीओ शूट करून सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. अंत्यसंस्कार करण्याची कोणतीच सोय नसल्याने बहिणीचा मृतदेह त्याने गेल्या दोन दिवसांपासून घरीच ठेवल्याचं या व्हिडीओत म्हटलं आहे.

“करोना विषाणूमुळे माझ्या बहिणीचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला. गेल्या दोन दिवसांपासून तिचं मृतदेह घरीच आहे. मला समजत नाहीये की मी काय करू? मी तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारसुद्धा करू शकत नाही, कारण मला सध्या सगळ्यांपासून वेगळं करण्यात आलं आहे. माझी मदत करायला कोणीच तयार नाही”, असं तो या व्हिडीओत म्हणतोय. लुकाने पोस्ट केलेल्या व्हिडीओत त्याच्या मागे बेडवर बहिणीचं पार्थिव पाहायला मिळत आहे.

लुकाच्या कुटुंबीयांना इटलीतील प्रशासनाने वेगळं ठेवल्याची माहिती समोर येत आहे. इतरांना करोना विषाणूची लागण होऊ नये म्हणून हे पाऊल उचलण्यात आलं आहे. मात्र बहिणीच्या अंतिम क्षणी तिच्यासोबत राहिल्याचं लूकने या व्हिडीओत सांगितलं आहे. त्यामुळे मलासुद्धा करोनाची लागण झाल्याची शंका वाटत आहे, असंदेखील तो म्हणाला आहे. लुकाने ‘गुमराह’ या टीव्ही शोमध्ये काम केलंय.

लुकाचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर इटलीतील अधिकाऱ्यांनी त्याच्या बहिणीचे अंत्यसंस्कार करण्यासाठी त्याला मदत केली. मात्र अंत्यसंस्काराला हजर राहण्यास कुटुंबातील कोणालाच परवानगी देण्यात आली नसल्याचं म्हटलं जात आहे.