करोनाच्या संकटाशी सामना करणाऱ्या भारतीयांसाठी एक खूशखबर आहे. भारतात डिसेंबर अखेरपर्यंत करोनाच्या लशीला आपत्कालीन वापरासाठी मान्यता मिळेल, अशी आशा दिल्ली एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी एएनआयशी बोलताना व्यक्त केली आहे. देशात सध्या सहा लशींवर काम सुरु आहे. यांपैकी दोन लशींचं शेवटच्या टप्प्यातील चाचणी सुरु असल्याचंही त्यांनी सांगितलं.

डॉ. गुलेरिया म्हणाले, “भारतात अनेक लशींच्या अंतिम टप्प्यातील चाचण्या सुरु आहेत. डिसेंबरअखेरपर्यंत किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात या लशींपैकी कोणत्याही लशीचा आपत्कालीन वापराची मंजुरी मिळण्याची शक्यत आहे. याद्वारे सार्वजनिक लशीकरणाच्या मोहिमेला सुरुवात होईल. कोल्ड चेन बनवणे, उपयुक्त स्टोअर वेअरहाऊस उपलब्ध करणे, रणनीती तयार करणे त्याचबरोबर लशीकरण आणि सिरिंजच्या उपलब्धतेसंदर्भात केंद्र आणि राज्यांमध्ये युद्धपातळीवर काम सुरु आहे.”

“आपल्याकडे चांगली माहिती उपलब्ध आहे. म्हणजेच लस चांगल्याप्रकारे सुरक्षित आहेत. लशींची सुरक्षा आणि प्रभावशीलतेशी कदापी तडजोड करण्यात आलेली नाही. ७०,००० ते ८०,००० स्वयंसेवकांना लस देण्यात आल्या आहेत. यांपैकी कोणावरही गंभीर प्रतिकूल परिणाम दिसून आलेला नाही. डेटावरुन लक्षात येतं की, अल्पावधीत लस सुरक्षित आहेत,” असेही यावेळी गुलेरिया यांनी सांगितलं.

चेन्नईतील चाचणीदरम्यान झालेल्या साईड इफेक्टसाबाबत बातम्यांवर बोलताना डॉ. गुलेरिया म्हणाले, “चेन्नई चाचणी प्रकरणावर लसीऐवजी वेगळ्याच बाबतीत भाष्य करण्यात आलं आहे. जेव्हा मोठ्या संख्येने आम्ही लोकांना लस देतो तेव्हा त्यांपैकी काही जणांना कोणता ना कोणता आजार होऊ शकतो. जो लशीसंदर्भत नसतो”

लशीकरण मोहिमेबाबत बोलताना डॉ. गलुरिया म्हणाले, “सुरुवातीला सर्वांना लस देण्यासाठी लस पुरेशा स्वरुपात उपलब्ध होणार नाही. हे पाहण्यासाठी आम्हाला एका प्राधान्यक्रम यादीची गरज आहे. सर्वप्रथम आम्ही त्या लोकांचं लशीकरण करु ज्यांची कोविडमुळे मृत्यूची शक्यता आहे. वृद्ध, अन्य आजारांनी पीडित आणि सर्वात पुढच्या फळीत काम करणाऱ्या कामगारांना पहिल्यांद्या डोस देण्यात यायला हवा. बुस्टर डोस दिल्यानंतर लस शरिरात चांगल्याप्रकारे अँटिबॉडिज तयार करण्यास सुरुवात करते. अनेक महिने यापासून सुरक्षितता मिळते. तोपर्यंत विषाणूच्या संक्रमितांची संख्या कमी होऊन जाईल.”